Sushma Andhare, Sharad Pawar  Sarkarnama
पुणे

Sushma Andhare,sharad Pawar News : अंधारेंचा 'मास्टरस्ट्रोक' पवारांना धक्का; थेट हडपसरचा उमेदवारच सांगून टाकला

Political News : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ 15 ते 18 जागांवर पेच असून हा तिढा लवकरच सोडविण्याचा महाविकास आघाडीतील घटक पक्षाचा प्रयत्न आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या मॅरेथॉन बैठका सध्या मुंबईत सुरू आहेत. या बैठकांमध्ये ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्याची अशा सूत्रावर जागांचे वाटप होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळाला असून या मतदारसंघातून थेट माजी आमदार महादेव बाबर यांची उमेदवारी जाहीर केली.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला याव्यात, म्हणून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाने हडपसर, पर्वती, वडगाव शेरी आणि खडकवासला या जागांवर प्रामुख्याने दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे शिवसेना (Shivsena) ठाकरे गट हडपसर, वडगाव शेरी, कोथरूड, खडकवासला या जागा आपल्या वाटेला यावेत, यासाठी प्रयत्न करत आहे. (MVA News)

हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे आमदार आहेत. मात्र चेतन तुपे हे अजित पवारांसोबत असल्याने या जागेवर ठाकरे गट देखील दावा करत आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. त्यामुळे ही जागा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत.

अशातच सुषमा अंधारे यांनी हा मतदारसंघ आम्हाला सुटला असून या मतदारसंघातून माजी आमदार महादेव बाबर हे उमेदवार असतील, अशी घोषणा केली आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये आगामी काळात मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

जागा वाटपाबाबत माहिती देताना पुण्यामध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये कोणताही मनमुठाव नाही सर्वच जागांवरती आता एकमत होत आले आहे. हडपसरची जागा देखील क्लिअर झाली असून फक्त पंधरा ते अठरा जागांवरती आता चर्चा सुरू आहे.

त्यामध्ये मुंबईतील कुलाबा, शिवडीची जागा, श्रीगोंदा का पारनेर, मुखेड, तुळजापूर की औसा, अशा 15 ते 18 जागांचा पेच अद्याप सुटलेला नाही. यामध्ये 9 जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. त्यासोबतच इतर जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या जागा वाटपामध्ये हडपसरची जागा ही शिवसेनेची असून त्या जागेवर महादेव बाबर हे निवडणूक लढवतील. महाविकास आघाडीकडून हडपसरची जागा शिवसेनेला सुटली असल्याची यावेळी सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT