Pankaja munde sushma andhare .jpg Sarkarnama
पुणे

Sushma Andhare: पंकजा मुंडे भाजपमध्ये भाडेकरू नाही, तर घरमालक : 'राजकीय एक्झिट'च्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंचं विधान

Pankaja Munde News: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित एका कवी संमेलनात 'राजकारणातून एक्झिट' घेण्याबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित एका कवी संमेलनात 'राजकारणातून एक्झिट' घेण्याबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्याचा संदर्भ घेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून पंकजा मुंडे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. सोबतच, त्यांनी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वादावर आणि जुन्या-नव्या नेत्यांमधील संघर्षावर थेट निशाणा साधला आहे.

पंकजा मुंडेंचं विधान काय?

परळीतील कवी संमेलनात एका कवीने राजकारणातील विसंगती व व्यवस्थेतील त्रुटींवर कविता सादर केली. या कवितेचा संदर्भ देत पंकजा मुंडे म्हणाल्या, "मला जर राजकारण माझ्यासारखं वाटलं नाही, माझ्या विचारांशी ते समरस नाही असं वाटलं, तर जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो, तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल. जो व्यक्ती बाहेर पडण्याची तयारी ठेवतो, तोच निर्भीडपणे आणि प्रामाणिकपणे राजकारण करू शकतो." त्यांच्या या विधानामुळे त्या भाजपमधील सध्याच्या परिस्थितीवर नाराज आहेत का, अशा चर्चांना उधाण आले.

सुषमा अंधारेंची पोस्ट...

पंकजा मुंडे यांच्याबद्दल कायम एक आपुलकी आणि सहानुभूती वाटत राहिली. कदाचित आम्ही दोघी शेजारच्या नंदनज आणि नाथरा या गावच्या आहोत म्हणून असेल. माझ्या वडिलांची, त्यांच्या वडिलांशी असणारी मैत्री हा एक धागा असेल किंवा आज आम्हा दोघींचेही वडील हयात नाहीत, हे भावनिक साधर्म्य असल्याचंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

काहीही असले तरी महिला राजकारणी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुनेत्रा वहिनी असोत किंवा भाजपमधील पंकजा मुंडे असोत, यांच्याबद्दल एक सहसंवेदना आहे. मात्र पंकजा मुंडे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाबद्दलचे मत बदलण्याची शक्यता अजिबात नाही.

भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे हा संघर्ष आता विकोपाला जात आहे. सत्ता काबीज करण्यासाठी ज्या छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले ते आता अडगळीला पडले आहेत आणि सत्ता आल्यानंतर ज्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवणार होते, त्यांनाच प्रेमाने मांडीवर घेऊन घास भरवण्याची कसरत सुरू असल्याचंही अंधारे यांनी म्हटलं आहे.

सुषमा अंधारे पुढे पोस्टमध्ये म्हणतात, त्यामुळे भाजपच्या पारंपारिक विचारसरणीत घडलेले जुने नेते, कार्यकर्ते, वैचारिक अधिष्ठान असणारे संघस्वयंसेवक आणि पक्ष वाढवण्यासाठी धडपडणारे बिनपगारी लोक हवालदिल झाले आहेत. अशा वातावरणात चंद्रकांत पाटील असोत किंवा पंकजा मुंडे, यांच्या मनात नैराश्य येणे स्वाभाविक आहे. एकनाथ खडसेंनी याच शह-काटशहाच्या राजकारणाला कंटाळून पक्ष सोडला होता.

परंतु पंकजा मुंडे यांचा स्वभाव बघता त्या शस्त्र टाकून देतील हे अजिबात पटत नाही आणि त्या इतर पक्षातही कधी जाणार नाहीत. कारण महाराष्ट्रात हा पक्ष मुळात खडसे, मुंडे आणि महाजनांनी रुजवला. त्या काळात फडणवीस यांची ओळख म्हणजे मुंडे साहेबांची बॅग वागवणारा माणूस अशी होती. म्हणूनच पंकजा मुंडे या भाजपमध्ये भाडेकरू नसून घरमालक आहेत.

बाहेरून आलेल्या भाडेकरूंनी घरमालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी, पंकजा मुंडे पक्षावरची नाराजी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवतील. त्या भाजप सोडून इतर पक्षात निश्चित जाणार नाहीत; फार फार तर काही काळ स्व-कोषात राहणे पसंत करतील किंवा आपल्या मुलाला राजकारणात लाँच करतील असंही सुषमा अंधारे पोस्टमधून म्हणाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT