Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

स्वारगेट-कात्रज मेट्रोला मंजुरी; अजित पवारांनी करून दाखवले !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे मेट्रोच्या स्वारगेट-कात्रज या विस्तारीत मार्गाला राज्य सरकारने बुधवारी मंजुरी दिली. तीन हजार ६६८ कोटी रूपये इतका खर्च या विस्तारीत मार्गाला येणार आहे. संपूर्ण मार्ग भुयारी असून येत्या पाच वर्षात पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळवून पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे.

पिंपरी ते स्वारगेट या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या विस्तार कात्रजपर्यंत करण्यात आला आहे. सुमारे साडेपाच किलोमीटर इतकी या मार्गाची लांबी आहे. स्वारगेट-कात्रज दरम्यान तीन स्थानके असलेला हा मार्ग पूर्णपणे भुयारी स्वरूपाचा आहे.या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेकडून एकुण ६५५ कोटी रूपयांचे अर्थसहाय्य महामेट्रोला मिळणार आहे. उर्वरित निधी राज्य सरकार, मेट्रो तसेच अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे.

मेट्रोचे काम पुणे आणि पिंपरीत प्रगतीपथावर आहे. पुण्यातील गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर या मार्गावरील तसेच पिंपरीतील कासारवाडी ते पिंपरी या मार्गाचे उद्घघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या महिन्यात पार पडले. त्यानंतर उर्वरित काम गतीने सुरू आहे. आता स्वारगेट ते कात्रज या नव्या विस्तारीत मार्गाला मंजुरी मिळाल्याने पुणे मेट्रोची व्याप्ती वाढली आहे.

येत्या काही वर्षात पुण्यात मेट्रोचे अनेक नवीन मार्ग प्रत्यक्षात येणार आहेत. वेगवेगळ्या मार्गांचे नियोजन सुरू आहे. ‘पीएमआरडीए’च्यावतीने शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. स्वारगेट-हडपसर, स्वारगेट खडकवासला, चांदणी चौक आदी मार्गांचा यात समावेश आहे. त्यामुळे पुढील किमान दहा वर्षे पुण्यात मेट्रोचे काम सुरूच राहणार आहे.

पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारणार असून सर्व लवकरात लवकर मार्गी लावण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी सांगितले आहे. त्यानुसार स्वारगेट-कात्रज मार्गाला मंजुरी मिळाली आहे. यापुढील अन्य मार्गांचे नियोजन, डीपीआर, प्रकल्पाची अंतीम मंजुरी आणि प्रत्यक्ष कामाला सुरवात या सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT