Deenanath Hospital Sarkarnama
पुणे

Deenanath Hospital : अखेर 'दीनानाथ' रुग्णलायावर कारवाईची कुऱ्हाड; सरकारचा आक्रमक पवित्रा

Deenanath Hospital : गर्भवती तनिषा (ईश्वरी) भिसे मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने प्रत्येक अहवालानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Hrishikesh Nalagune

Deenanath Hospital : गर्भवती तनिषा (ईश्वरी) भिसे मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने प्रत्येक अहवालानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यात आरोग्य विभागाच्या अहवालाच्या आधारे डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर धर्मादाय सहआयुक्त आणि विधी व न्याय विभागाच्या अहवालाच्या आधारे दीनानाथ रुग्णालयावरही कारवाई करण्यात आली आहे.

सुरुवातीला आरोग्य विभागाने पुणे मंडळाच्या आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन केली होती. यामध्ये मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझिटची मागणी करून रुग्णाला साडेपाच तास उपचारांविना थांबवून ठेवले, त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आणि मृत्यू झाला, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. या समितीच्या शिफारशीच्या आधारे डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यापाठोपाठ दीनानाथ मंगेशकर रुग्णालय धर्मादाय रुग्णालय असल्याने धर्मादाय सहआयुक्त डॉ. रजनी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली 4 एप्रिल रोजी चौकशी समिती गठित केली होती. विधी व न्याय विभागाचे उपसचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव होते. या अहवालामध्ये डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आणि रुग्णालय प्रशासनालाही जबाबदार धरले गेले.

धर्मादाय निधीमध्ये पैसे शिल्लक असूनही भिसे कुटुंबियांकडे डिपॉझिट मागितली, धर्मादाय अंतर्गत रुग्णावर उपचार केले नाहीत, असा ठपका डॉ. घैसास आणि रुग्णालयावर ठेवण्यात आला होता. या अहवालाच्या आधारे आता दीनानाथ रुग्णालयाला 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय धर्मादाय रुग्णालयांबाबतचे नियमही बदलणार आहेत. रुग्णांकडून डिपॉझिट न घेण्याचा नियमही बनविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दंडाची रक्कम एफडी केली जाणार :

दीनानाथ रुग्णालयाला ठोठवलेल्या 10 लाख रुपयांच्या दंडाची तनिषा भिसे यांच्या नवजात जुळ्या मुलींच्या नावे बँकेत एफडी केली जाणार आहे. दोघीही 18 वर्षांच्या झाल्यानंतर व्याजासहित रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात भिसे यांच्या दोन्ही मुलींना आर्थिक आधार मिळू शकणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT