Teacher  Sarkarnama
पुणे

Teachers News : ऑनलाइन कामांनी आधीच हैराण शिक्षकांवर आणखी एक भार! शाळा स्वच्छतेचे फर्मान

Teachers School Work : शिक्षकांवरील आधीच प्रशासकीय कामांचा भार आहे. त्यातच त्यांनी आणखी या जबाबदारी देण्यात आली आहे. ‘चला शाळेत जाऊ या’ या उपक्रमांतर्गत दोन टप्प्यांत ही मोहीम पार पाडेल.

Roshan More

Pune News : ऑनलाइन कामांचा वाढता व्याप, विविध अहवालांची पूर्तता आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे आधीच त्रस्त असलेल्या शिक्षकांवर आता शाळा स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या कामाची भर पडणार आहे.

शाळा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने १८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ‘माझी शाळा माझी जबाबदारी’ ही विशेष मोहीम जाहीर केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कामाचा व्याप आणखी वाढणार असून, विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी आणि अतिरिक्त कामे करायची कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘चला शाळेत जाऊ या’ या उपक्रमांतर्गत दोन टप्प्यांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शाळेतील वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि क्रीडांगणाची पाहणी करून आवश्यक कामांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर स्वच्छता, किरकोळ दुरुस्ती आणि सुशोभीकरणाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. या कामांचे नियोजन आणि देखरेखीची जबाबदारीही शाळा प्रशासनावर सोपविण्यात आली आहे.

शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले आहे. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून शाळांचे वातावरण अध्ययन-अध्यापनासाठी पोषक बनविण्याचा विभागाचा उद्देश आहे. मात्र, शिक्षकांवरील आधीच वाढलेल्या प्रशासकीय कामांचा विचार करून या मोहिमेची अंमलबजावणी कशी केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

अतिरिक्त निधी नाही; वर्गणी घेण्यासही मनाई

शाळांच्या स्वच्छता आणि देखभालीसाठी समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एकत्रित शालेय अनुदानातून नियमानुसार खर्च करता येणार आहे. मात्र, या मोहिमेसाठी स्वतंत्र अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाची अनिवार्य आर्थिक वर्गणी घेण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध निधी आणि संसाधनांच्या आधारेच शाळांना ही मोहीम राबवावी लागणार आहे.

दोन टप्प्यांत होणार अंमलबजावणी

पहिला टप्पा १८ ते २४ ऑक्टोबर

शाळेतील विविध सुविधांची पाहणी करून स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्तीची आवश्यकता निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार आवश्यक कामांची यादी आणि कृती आराखडा तयार करावा लागेल.

दुसरा टप्पा २५ ते ३१ ऑक्टोबर

या कालावधीत प्रत्यक्ष स्वच्छता, देखभाल, किरकोळ दुरुस्ती आणि सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. शाळा व्यवस्थापन समिती आणि संबंधित घटकांच्या सहभागातून ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

शाळांचे वातावरण स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे आवश्यक असले, तरी त्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त प्रशासकीय जबाबदाऱ्या टाकताना त्यांच्या अध्यापनाच्या मुख्य कामावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT