Pune News, 17 Mar : उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकांना यंदा सुट्टीमध्ये जनगणनेच्या कामाला जुंपले जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गुरुजींना जास्तीचं काम लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.
जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना १६ मे ते १५ जून या कालावधीमध्ये मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे आता या शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कोरेकर यांनी स्वतंत्रपणे आदेश काढून जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना आदेश काढल्यामुळे शिक्षक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन वर्षांत लोकसभा, विधानसभा, नगरपरिषदा, जिल्हा परिषदांच्या निवडणूक कामकाजात गुरफटलेल्या शिक्षकांना आपली सरकारी कामातून सुटका झाल्याचे वाटले असताना पुन्हा एकदा येऊ घातलेल्या जनगणनेच्या कामकाजाकडे त्यांना डोळ्यात तेल घालून काम करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे.
१ मेनंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असली तरी शिक्षकांना मात्र जनगणनेच्या कामासाठी प्रशिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर १६ मे पासून ते १५ जूनपर्यंत जनगणनेच्या कामकाजासाठी शिक्षकांना आपले मुख्यालय सोडता येणार नाही.
बाहेर गावच्या शिक्षकांनी मूळगावी मे महिन्यात केलेल्या नियोजनावर पाणी पडणार असून, उन्हाळ्याच्या सुट्टीतील पर्यटन, देवदर्शन, लग्नकार्य आदी कार्यक्रमावर गदा येणार असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, राष्ट्रीय जनगणनेच्या कामासाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. या कामासाठी शिक्षकांना १६ मे ते १५ जून या कालावधीमध्ये त्यांच्या मुख्यालयात उपस्थित राहावे लागेल. त्यांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.