Sushil Khodwekar IAS
Sushil Khodwekar IAS Sarkarnama
पुणे

TET Exam Scam : देशमुख `बकरे` शोधायचा, सुपे `कापायचा` आणि वाटा IAS खोडवेकरकडे

सनील गाडेकर

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे प्रसंग फारच दुर्मिळ असताता. पण शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात (TTE exam scam) पहिल्यांदाच सुशील खोडवेकर (वय ४3) (Sushsil Khodwekar) यास अटक झाली असून येत्या 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

हा घोटाळा होते वेळी खोडवेकर शिक्षण खात्यातील आस्थापना विभागात उपसचिव होता. सध्या त्यांची नियुक्ती कृषी खात्यात आहे. या साऱ्या प्रकरणाच्या मूळापर्यंत पुणे पोलिस पोहोचत असून यात मोठा मासा त्यांना सापडला आहे. साॅफ्टवेअर कंपनी, संचालक दर्जाचे अधिकारी आणि त्यात खोडवेकरची साथ असे हे सारे प्रकरण घडले आहे. सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी TET परीक्षेत बेकायदा पास करण्याचा `पराक्रम` जी. ए. साॅफ्टवेअरचा प्रीतीश देशमुख, शिक्षण संचालक तुकाराम सुपे आणि खोडवेकर यांनी केला.

खोडवेकर यास त्याच्या ठाण्यातील घरातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

या प्रकरणात सुपे, सावरीकर, जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नोलाॅजीस कंपनीचा संचालक डाॅ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह इतर काही शासकीय नोकरदार तसेच एजंट आणि साखळीतील इतरांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींकडे केलेल्या चौकशीत खोडवेकर यांचा देखील या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे समोर आले. तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल माहिती घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नोलाॅजीस कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यास मदत केली. सुपे आणि देशमुख यांनी मनोज डोंगरे मार्फत खोडवेकर यांना लाखो रुपये दिले आहेत. सुपे यांचे खात्यांतर्गत गैरवर्तन असतानाही त्यास त्यातून बेकसूर ठरविण्यात खोडवेकर यांनी भूमिका बजावली, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार घाडगे करीत आहेत.

देशमुखच्या सूचनेवरून सुपेंना आदेश :

देशमुख यांच्या सूचनेवरून टीर्इटीमधील अपात्र विद्यार्थ्यांना पात्र असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत वरिष्ठ या नात्याने खोडवेकर सुपे यांना आदेश देत होते. खोडवेकर हे आयएएस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार असल्याने या गुन्ह्यात त्यांनी पूरक काही निर्णय घेतले आहेत, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी :

खोडवेकर यांनी किती व कोणत्या विद्यार्थ्यांना पात्र असल्याचे प्रमाणपत्र देण्याचे सांगितले? आरोपीला या प्रकरणात किती रक्कम प्राप्त झाली तसेच या गुन्ह्याचा सखोल तपास करायचा आहे. तसेच सुपे आणि देशमुख यांनी खोडवेकर यांना दिलेली रक्कम हस्तगत करायची आहे. त्यामुळे त्यांना पोलिस कोठडीत देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी खोडवेकर यांनी ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT