पुणे : ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ (Fractured Freedom) या पुस्तकाला दिलेला राज्यसरकारने जाहीर केलेला पुरस्कार अचानकपणे रद्द केल्यानंतर राजीनामा सत्राची मालिका सुरू झाली. ती अद्यापही थांबण्याचे चिन्हे दिसत नाही. आता भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. देशमुख यांच्या भूमिकेला समर्थन देत, समितीचे सदस्य डॉ. विवेक घोटाळे यांनीही राजीनामा देण्याची घोषणा केली.
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम' हे पुस्तक आपण वाचलेले आहे. यात काहीही आक्षेपार्ह नाही. मूळ इंग्रजी पुस्तकात आणि मराठी अनुवादात नक्षलवादाचे उदात्तीकरण आणि हिंसेचा पुरस्कार लेखकाने केलेला नाही. या पुस्तकावर केंद्र किंवा राज्य सरकारने आजवर तरी बंदी घातलेली नसून, ते दोन वर्षांपासून विक्रीसाठी बाजारात आहे. मराठीतील अनुवादीत पुस्तकही विक्रीसाठी उपलब्ध आहे.
तसेच, राज्याचा जो पुरस्कार जाहीर झाला होता, तो मूळ पुस्तकासाठी नाही, तर उत्तम प्रकारे केलेल्या अनुवादाला असतो. यामुळे पुरस्कार रद्द करणे फक्त अनुचितच नाही, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मौलिक संविधानिक मूल्यांशी प्रतारणा करणारी आहे. मी याचा तीव्र निषेध करत आहे, असे देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
‘माझ्या अध्यक्षतेखालील भाषा सल्लागार समितीने पुढील पंचवीस वर्षांसाठीचे मराठी भाषा विषयक धोरण परिश्रमपूर्वक तयार करून, सरकारला सादर केले आहे. त्या संदर्भात सरकारला माझे सहकार्य असेल’,असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. देशमुख यांच्या राजीनाम्याला समितीचे सदस्य डॉ. घोटाळे यांनीही समर्थन दिले आहे.
‘अध्यक्षांचा राजीनामा म्हणजे खरे तर सर्व समितीचा राजीनामा असतो. भाषा सल्लागार समितीचा एक सदस्य असल्याने मी देखील राजीनामा देत आहे. लक्ष्मीकांत देशमुख, आनंद करंदीकर, डॉ. प्रज्ञा दया पवार, नीरजा, शरद बाविस्कर आदींच्या भूमिकेशी मी सहमत आहे’, असे डॉ. घोटाळे यांनी जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.