NCP Pune Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत ठरणार पुण्यातल्या महाविकास आघाडीचे भवितव्य

पुण्यातला पहिला मेळावा येत्या गुरूवारी कृष्णसुंदर लॉन्स येथे होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महापालिका निवडणुकांच्या पाश्‍र्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने (nationalist Congress) येत्या दोन दिवसात शहरात दोन ठिकाणी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ मेळावा आयोजित करण्यात आला आहे.कॉंग्रेस-शिवसेनेसोबत महाविकास आघाडी करायची की नाही याबाबत मेळाव्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत.

पुण्यातला पहिला मेळावा येत्या गुरूवारी कृष्णसुंदर लॉन्स येथे होणार आहे. शहरातील पश्‍चिम भागातील चार विधासभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी हा मेळावा होणार आहे.दुसरा मेळावा शुक्रवारी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे होणार आहे. शहराच्या पूर्व भागातील चार विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित या दोन्ही मेळाव्याला मार्गदर्शक करणार आहेत.

पुण्यात महापालिका निवडणूक लढताना कॉंग्रेस तसेच शिवसेनेबरोबर आघाडी न करता स्वतंत्रपणे लढावी, अशी मागणी बहुतांश कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. सत्तेत येण्याइतपत आपली ताकद असताना शिवसेना व कॉंग्रेसबरोबर आघाडी कशासाठी ही या पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. मात्र, काही पदाधिकारी आघाडी करावी या मताचे आहेत.परस्पर मतं असल्याने सारासार विचार करून आघाडीबाबत निर्णय होणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.आघाडीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेणे महत्वाचे असल्याने या मेळाव्यात त्यावर भर देण्यात येणार आहे.

शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. आठपैकी दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा निसटता पराभव झाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना व भाजपातून येणाऱ्या संभाव्य नगरसेवकांच्या ताकदीवर पुण्यात सत्ता स्थापन करण्याची व्यूह्यरचना राष्ट्रवादीने आखली आहे.काहीही करून यावेळी पुण्यातील सत्ता ताब्यात घ्यायचीच यासाठी नियोजन करण्यात येत आहे.त्यामुळे या दोन्ही मेळाव्यासाठी पक्षाच्यावतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे.

महाआघाडी करायची की नाही याबाबत राष्ट्रवादीत विचारमंथन होणार असले तरी कॉंग्रेसमध्येदेखील आघाडी करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत.राष्ट्रवादी व शिवसेनेबरोबर आघाडी करण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढविण्यासाठी पक्षातील एक गट आग्रही आहे.तात्पुरता विचार न करता पक्षाच्या भवितव्याचा विचार करून स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जावे, अशी पक्षातील काही नेत्यांची भूमिका आहे.

आघाडीतील तिसरा महत्वाचा घटक असलेल्या शिवसेनाला सन्मानजनक आघाडी हवी आहे. ८० जागा मिळाल्या तरच आघाडीत सहभागी होण्याची भूमिका पक्षाने जाहीर केली आहे.त्यामुळे या तीन पक्षांची आघाडी होणार की नाही हे स्पष्ट व्हायला आणखी किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT