Pimpri-Chinchwad Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad: अहो आश्चर्यम! होर्डिंग्ज कोसळून चाळीस हजार ग्राहकांचा वीजपुरवठा झाला खंडित

PCMC Hoarding Accident: : होर्डिंग्जमुळे आता वीजही होतेय गायब, होर्डिंग्ज कोसळून चाळीस हजार घरातील वीज झाली खंडित

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये १७ एप्रिलला पुनावळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच निष्पापांचा नाहक बळी गेला होता. तर, ३० मे रोजी हिंजवडीत होर्डिंग कोसळून तिघे जखमी झाले होते. आता होर्डिंग्ज कोसळून हजारो ग्राहकांची वीजही गायब होऊ लागली आहे.

काल चाकण (ता.खेड,जि.पुणे) शहर व परिसरात होर्डिंग्ज वीजतारांवर कोसळून ४६ हजार ग्राहकांची वीजपुरवठा खंडीत झाला. त्यातील बहूतांश अनधिकृत असल्याचे समजते. त्यामुळे अनेक औद्योगिक ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडीत झाला. त्याचा त्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे. मात्र, आज वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

त्यात चाकण येथील महापारेषणच्या ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने १० ते १५ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. त्यातून चाकण एमआयडीसीत भारनियमन करावे लागण्याची शक्यता महावितरणने वर्तवली आहे. परिणामी दोन्ही बाजूंनी तेथील उद्योजक त्यातही लघुउद्योजक अडचणीत आले आहेत. नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू झाले असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी चार दिवस लागणार आहेत.

वादळी मुसळधार पूर्वमोसमी पावसामुळे होर्डिंग्ज हे महावितरणच्या वीजवाहिन्यांवर पडल्याने चाकण शहर व चाकण एमआयडीसी परिसरातील सुमारे ४६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा काल सायंकाळी खंडित झाला. विशेष म्हणजे ९० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा केवळ होर्डिंग्जमुळे खंडीत झाल्याचा दावा महावितरणने आज केला.

तर उर्वरित १० टक्के वीजपुरवठा मोठी झाडे व फांद्या यंत्रणेवर पडल्यामुळे खंडित झाल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले. फ्लेक्स वीजवाहिन्यांच्या तारांवर पडल्याने चाकणमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला. दरम्यान, त्यातून महावितरणची पावसाळापूर्व कामे झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT