Pimpri News: पिंपरी-चिंचवडमध्ये १७ एप्रिलला पुनावळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच निष्पापांचा नाहक बळी गेला होता. तर,तीन दिवसांपूर्वी (३० मे) ला हिंजवडीत अधिकृत होर्डिंग कोसळून तिघे जखमी झाले.या होर्डिंग दुर्घटना सत्रातून त्यांच्या उभारणीतच दोष असल्याचा संशय निर्माण झाला आहे.मागच्या दीड महिन्यात अनधिकृत नाही,तर अधिकृत होर्डिंग्जचा व त्यांच्या स्ट्रक्चरल ऑ़़डिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये शेकडो बेकायदेशीर होर्डिंग्ज असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाना काटे यांनी केला आहे. आता शहरवासियांवर होर्डिंग दुर्घटनेची टांगती तलवार लटकलेली आहे.या दुर्घटनेसाठी आणि अनाधिकृत होर्डिंग्जसाठी जबाबदार असलेले महापालिकेचे अधिकारी,पालिकेचा आकाशचिन्ह व परवाना विभागावर, मात्र अद्याप काहीच कारवाई झालेली नाही.
हिंजवडी परिसरात एक नाही तर सात फलक कोसळले.त्यातील तिघांना जखमी करणारे 'विबग्योर' शाळेसमोर कोसळलेले होर्डिंग हे एका पत्रकाराचे आहे.त्याच्याविरुद्ध हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र,आऱोपीला अद्याप अटक केलेली नाही.
१७ एप्रिलच्या पुनावळे होर्डिंग दुर्घटनेतबाबत रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या दोन्ही प्रकरणांत पालिकेचा सबंधित विभाग आणि तेथील अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली गेली आहे. मात्र, या अपघातामागे पालिकेचा अप्रत्यक्ष सबंध आहे.अनधिकृत होर्डिंग्ज उभे राहण्यात पालिकाच जबाबदार आहे. आर्थिक देवाणघेवाण करून अशा प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याची चर्चा आहे. पुनावळ्यात होर्डिंग कोसळून पाच निष्पाप जीवांचा बळी गेला, तेव्हा पालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाचे प्रमुख असलेले सहाय्यक आयुक्त हे रजेवर होते. ते नंतर घटनास्थळीच काय पालिकेतही फिरकले नाही. नंतर त्यांनी स्वताहून आपली बदली मागून ती करवून घेतली.
दरम्यान, होर्डिंग अपघात सत्रानंतर विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीने महापालिका प्रशासनाला आज धारेवर धरले. होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट केले आहे का? परवानगीनुसारच होर्डिंग उभी केली आहेत का ? अनाधिकृत असल्यास काय कारवाई केली? ती केली कारवाई केली नसल्यास त्याला कोण जबाबदार? असे प्रश्न नाना काटे यांनी प्रशासनाला विचारले. होर्डींगवर कारवाई करताना महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून होर्डिंगचालकाला मदत केली जात असल्याचा आऱोप त्यांनी केला आहे. शहरात आजही शेकडो होर्डिंग अनाधिकृत असून प्रशासनाकडून कारवाईचा केवळ दिखावऊपणा होतोय,असा दावाही त्यांनी केला आहे.
Edited by : Rashmi Mane