Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation sarkarnama
पुणे

Pune Municipal Corporation : दिल्लीतून आलेल्या अधिकाऱ्यांनी उडविले पुणे महापालिकेच्या कामाचे धिंडवडे

सरकारनामा ब्यूरो

Pune Municipal Corporation News : पुणे शहरात ‘जी २०’ परिषदेची पहिली बैठक जानेवारी महिन्यात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘जी २०’ परिषदेसाठी महापालिकेकडून तयारी जोरात सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. पण त्या आधी दिल्लीतून आलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून शहरातील विविध कामाबाबत पाहणी करण्यात येत आहे.

मात्र दिल्लीतून आलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता या व्हीआयपी मार्गाची उभी असलेली बेवारस वाहने, तुटलेले पादचारी मार्ग अशा त्रुटी दिसून आल्याने हे दुरूस्त करा हे सांगण्याची वेळ आली. त्यामुळे महापालिकेच्या कामाचे दिल्लीतून आलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी एक प्रकारे धिंडवडेच उडविले आहेत.

तसेच पादचारी मार्ग, रस्ते दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची कामे १० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात जानेवारी रोजी ‘जी २०’ची पहिली बैठक होणार आहे. या संदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी, केंद्र सरकारच्या गृह तसेच राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी पुण्यात आलेत. त्यांनी आज विमानतळ ते सेनापती बापट रस्ता या मार्गाची पाहणी केली.

यावेळी महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पोलिस आयुक्त रितेशकुमार यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. तर पुण्यात होणाऱ्या बैठकीसाठी ३७ देशांमधील सुमारे १३० हून अधिक प्रतिनिधी येणार आहेत. काही प्रतिनिधी थेट पुण्यात तर काही मुंबईवरून पुण्यात येणार आहेत. प्रतिनिधींची निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्थेचा आढावा आज बैठकीत घेण्यात आला.

१४ जानेवारीपासून प्रतिनिधी येणार असून त्यापैकी काही १८ जानेवारीपर्यंत मुक्कामी असतील. तर १५ ते १७ बैठक होणार आहे. तर १६ तारखेला सायंकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम व गाला डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वी या प्रतिनिधींसाठी जाधवगढी आणि शनिवारवाड्याची भेट आयोजिण्यात आली होती. मात्र, आता हे प्रतिनिधी आपल्या इच्छेनुसार ऐतिहासिक वास्तूंना भेट देतील, असे बैठकीत सांगण्यात आले.

केंद्र सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आज लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील पंचतारांकित हॉलेटपर्यंत रस्त्याची पाहणी केली. यामध्ये अनेक ठिकाणी बेवारस वाहने आढळून आली. राडारोडा पडलेला दिसून आला. पदपथाची दुरावस्था या अधिकाऱ्यांना दिसून आले.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देऊन स्वच्छता दुरुस्तीचे आदेश दिले. काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने त्यावर त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. काही ठिकाणी नव्याने सिग्नल बसविण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.

दरम्यान, याबाबत महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं की, ''जी २० बैठकीच्या निमित्ताने महापालिकेची तयारी व प्रवास व्यवस्था याबाबतचा आज आढावा घेण्यात आला. पुढील काही दिवसात रात्रीच्या वेळी विमानतळ ते सेनापती बापट रस्त्याची पाहणी केली जाणार आहे. ही परिषद होत असताना शहरातील रस्ते बंद ठेवले जाणार नाहीत. मात्र, प्रतिनिधींच्या प्रवासात अडथळा येऊ नये, यासाठी काही उपाययोजना केल्या जातील, असं ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT