Drug Mafia Lalit Patil  Sarkarnama
पुणे

Drug Mafia Lalit Patil : ललित पाटील प्रकरणात धक्कादायक खुलासा; बड्या तस्करांच्या संपर्कात असल्याचा संशय

Sasoon Hospital Drug Racket : अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील पसार झाल्याने न्यायालयाने पोलिसांना फटकारले

Ganesh Thombare

Pune News: पुण्यातील ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी ललित पाटील हा पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. त्यानंतर या प्रकरणाची राज्यात मोठी चर्चा झाली. आता या प्रकरणासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.

ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील व साथीदार अभिषेक बलकवडे हे अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यासाठी परराज्यात वास्तव्यास होते. तसेच देशातील बड्या अमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी न्यायालयात दिली आहे. या प्रकरणी आता ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि साथीदाराला न्यायालयाने १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ससून रुग्णालयाच्या गेटवर अमली पदार्थविरोधी पथकाने शनिवारी तब्बल दोन कोटी १४ लाखांचे अमली पदार्थ पकडले होते. या वेळी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ललित पाटीलला अमली पदार्थ देण्यासाठी आलेल्या सुभाष मंडल व शेखला अटक करण्यात आली. मात्र, यानंतर ललित पाटील ससून रुग्णालयातून पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. त्यानंतर ललित पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ललित पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे पसार झाल्यानंतर त्यांचा शोध विशेष पथकाकडून घेण्यात येत होता. यानंतर भूषण आणि अभिषेक या दोघांना पोलिसांनी मंगळवारी उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधूल अटक केली. त्यानंतर त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली.

दरम्यान, अमली पदार्थ विक्रीचे जाळे देशासह परदेशात असल्याचा संशय पोलिसांना असून, या अमली पदार्थ विक्रीत मोठमोठे तस्कर सहभागी असल्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आता पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.

या अमली पदार्थाच्या तस्करीतून पाटील आणि त्याच्या साथीदारांनी मोठी मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे. हे अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा नेमकी कोणी केला ? या संदर्भानेदेखील पोलिस पुढील तपास करणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

पोलिसांना न्यायालयाने फटकारले

अमली पदार्थ तस्करी प्रकरणी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याच्या साथीदाराला उत्तर प्रदेशातून अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. या वेळी पोलिसांनी या दोघांना पोलिस कोठडीची विनंती केली, तर ललित पाटील हा ससून रुग्णालयात पोलिसांच्या निगराणीखााली उपचार घेत होता. मात्र, तरीही तो पसार झाला, यावरूनच न्यायालयाने पोलिसांना चांगलेच फटकारले.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT