Pune Municipal Corporation sarkarnama
पुणे

Pune Municipal Corporation : पुणेकरांनी दाखवला महापालिकेला हिसका; १६ लाखांचे पाठवले बिल

Pune Municipal Corporation : सोसायटीची सीमाभिंत जाहिरातींसाठी बेकायदेशीरपणे रंगविली...

सरकारनामा ब्यूरो

Pune Municipal Corporation : सोसायटीची सीमाभिंत जाहिरातींसाठी बेकायदेशीरपणे रंगविली म्हणून कोथरूडमधील एका सोसायटीने महापालिकेला चांगलाच हिसका दाखवला आहे. सोसायटीची सीमाभिंत बेकायदेशीरपणे रंगविली म्हणून थेट १६ लाखांचे बिलच या सोसायटीने पुणे महापालिकेला पाठवले आहे. त्यानंतर मात्र महापालिकेने आपली चूक कबूल केली आहे.

बेकायदा जाहिराती लावल्याबद्दल किंवा खासगी मिळकतीवर विनापरवाना रंगरंगोटी केली तर महापालिका कारवाई करते. परंतु, हिच चूक महापालिकेने केली तर? सजग पुणेकर महापालिकेला सोडतील का? शक्यच नाही. असाच एक प्रकार समोर आला असून सोसायटीची सीमाभिंत जाहिरातींसाठी बेकायदेशीरपणे रंगविली म्हणून कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीने महापालिकेला १६ लाख रुपयांचे बिल पाठविले आहे.

त्यामुळे नरमलेल्या महापालिकेने सीमा भिंत पूर्ववत करून देण्याचे लेखी आश्वासन दिले आणि आपली चूकही कबूल केली. कोथरूडमध्ये गुळवणी महाराज रस्त्यावर सिटी प्राईडजवळ ४८३ सदनिकांची 'स्वप्नशिल्प' सोसायटी आहे. या सोसायटीच्या सीमाभिंतीवर महापालिका गेल्या ५-७ वर्षांपासून जाहिराती रंगवते.

महापालिकेने १५ दिवसांपूर्वी आकाशचिन्ह धोरण जाहीर केले. त्यात इतर मुद्द्यांबरोबरच भिंतीवर विनापरवाना रंगरंगोटी केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्याची दखल घेऊन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली.

महापालिका आपल्या सोसायटीच्या सीमा भिंतीवर गेली अनेक वर्षे विनापरवाना जाहिराती रंगवित असल्याबद्दल काही तरी केले पाहिजे, असे त्यांचे ठरले. त्यानुसार सोसायटीच्या अध्यक्ष दिलीप देशपांडे यांनी २२ डिसेंबर रोजी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना पत्र पाठविले.

'सोसायटीची परवानगी न घेता अनेक वर्षे महापालिका जाहिराती रंगविते. आकाशचिन्ह विभागाच्या दरांनुसार महापालिकेने बिलापोटी १६ लाख रुपये द्यावेत,' असेही त्यात म्हटले. सोसायटीचे पदाधिकारी आयुक्तांना त्यासाठी भेटले. त्याची दखल आयुक्त विक्रमकुमार यांनी घेतली.

वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय आयुक्त राजेश गुर्रम यांनी दोन दिवसांपूर्वी सोसायटीला पत्र पाठविले. त्यात म्हटले आहे की, ''जाहिरातींद्वारे उत्पन्न कमविण्याचा महापालिकेचा उद्देश नव्हता. राज्य सरकारच्या धोरणानुसार जनजागरूकता निर्माण करण्यासाठी या जाहिराती करण्यात आल्या. महापालिकेकडे सध्या निधीची कमतरता आहे. तो उपलब्ध झाल्यावर सोसायटीची भिंत पूर्ववत केली जाईल'', असं सांगितलं.

दरम्यान, या बाबत 'स्वप्नशिल्प' सोसायटीचे अध्यक्ष दिलीप देशपांडे म्हणाले, ''आमची सोसायटी रस्त्यावर आहे. त्याचा फायदा घेऊन महापालिकाच विनापरवाना जाहिराती रंगविते. हे महापालिकेच्याच नियमाचे उल्लंघन आहे. त्यामुळे सोसायटीने आयुक्तांकडे दाद मागितली आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सीमा भिंत पूर्ववत होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत,'' असं देशपांडे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT