Narendra Modi, Eknath Shinde News Sarkarnama
पुणे

Cabinet Extension News : 'मोदी @9' मुळे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ विस्तारालाही लागलाय ब्रेक?

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri-Chinchwad News : महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ विस्ताराचा उद्याचा (ता.१९) शिवसेना स्थापनादिनाचाही मुहूर्तही आता हुकणार आहे. आता त्यासाठी राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा नवा मुहूर्त देण्यात आला आहे. त्यामुळे तोपर्यंत गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या (मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी कोट शिवलेले) त्यातही शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांना वाट पहावी लागणार आहे.

यापूर्वी मंत्रीमंडळ विस्ताराचे अनेक मुहूर्त हुकलेले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांचाही पुन्हा हिरमोड झाला आहे. कारण शहराचा मंत्रीपदाचा बॅकलॉग या विस्तारात भरून निघून प्रथमच राज्यमंत्रीपद, तरी मिळेल, अशी आशा त्यांना लागलेली आहे. एक आमदार असलेल्या शेजारच्या मावळ तालुक्याला मंत्रीपद मिळाले. मात्र, तीन आमदार असलेली उद्योगनगरी त्यापासून अद्याप वंचित असल्याने तेथे रुखरुख आहे. आगामी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका निवडणुकीत पुन्हा कमळ फुलविण्यासाठी शहराला मंत्रीपद मिळेल, अशी आशा, मात्र शहरवासियांनी सोडलेली नाही.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करून गेल्यावर्षी जूनला राज्यात सत्तांतर घडवले. भाजपसह ते राज्यात सत्तेत आले. त्यामुळे त्यांच्या गटाला केंद्रात एक वा दोन मंत्रीपदे दिली जाणार आहे. हा केंद्रीय विस्तार झाल्यानंतर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचाही तो होणार होता. मात्र, या ना त्या कारणाने केंद्रीय विस्तार रखडल्याने राज्याचाही तो लटकला. त्यासाठी तारीख पे तारीख देण्यात येत होती.

शेवटी शिवसेनेच्या वर्धापनदिनापर्यंत तो होईल, असे शेवटी सांगण्यात आले. मात्र, आता तो मुहूर्तही चुकणार हे आता जवळपास नक्की झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला ३० जूनला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने भाजपने (BJP) देशभर मोदी @9 ही मोहीम सुरु केली आहे.

त्यामुळे केंद्रीय व त्यातून राज्य मंत्रीमंडळाचाही विस्तार रखडला गेला आहे. ३० जूनपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार असल्याने तोपर्यंत विस्तार करण्यात येणार नसल्याचे जवळपास नक्की आहे. तो आता राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर होईल, असा अंदाज भाजपच्या राज्य स्तरावरील एका पदाधिकाऱ्याने आज 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला. हा मुहूर्त, तरी खरा ठरतो का याकडे आता पिंपरी चिंचवडसह राज्याचेही लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT