Mahesh Landge, Laxman Jagtap News Sarkarnama
पुणे

PCMC Political News: भाजपच्या चिंचवड आणि भोसरीच्या आमदारांचे 'हे' स्वप्न मोदींच्या उद्घाटनातून झाले साकार

BJP Political News: प्रतिदिन १ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करून १४ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या (ता.१) पुणे दौऱ्यात त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे (waste to energy project) उद्घाटन केले. त्यामुळे गेली ३३ वर्षे दुर्गंधीचा सामना करणाऱ्या मोशीकरांनी आनंदोत्सव केला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या 'भोसरी व्हीजन- २०२०'ची स्वप्नपूर्ती झाली. तसेच पिंपरी-चिंचवडकरांसह शहरातील चिंचवडचे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचेही मेट्रोचे स्वप्न साकार झाले.

'भोसरीव्हीजन- २०२०' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत भोसरीचे भाजपचे (BJP) आमदार आणि पक्षाचे माजी शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी शहरातील कचऱ्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी 'वेस्ट टू एनर्जी' अर्थात कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पाचे काम २०१८ मध्ये सुरू झाले होते. तेथे प्रतिदिन १ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करून १४ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. यामुळे मोशी आणि कचरा डेपो परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन आनंद व्यक्त केला. यावेळी कामगार नेते सचिन लांडगे, माजी नगरसेवक सागर गवळी, कुंदन गायकवाड, विकास डोळस, लक्ष्मण सस्ते, दिनेश यादव, संतोष मोरे, दत्ता गव्हाणे, विनायक मोरे, सागर हिंगणे यांच्यासह मोशी आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. पिंपरी पालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतील बोऱ्हाडेवाडी प्रकल्पात घरे मिळालेल्या लाभार्थ्यांनीही आनंदोत्सव केला. कारण त्यांनाही आज मोदींच्या हस्ते आपल्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळाल्या.

पुणे व पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका, पीएमआरडीए आणि मेट्रोच्या १ हजार ९७० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन शिवाजीनगर येथील पोलीस परेड ग्राउंडवर मोदींच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. त्यापैकी सुमारे १ हजार ७२० कोटी रुपयांचे प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहरातील व त्यातही भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. प्रस्तावित प्रकल्प पूर्णत्वास नेऊन शहराला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रामाणिक काम करीत राहणार आहे, असे लांडगे म्हणाले.

लक्ष्मण जगताप यांचे मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात

मेट्रोच्या दुसऱ्या टप्याचे उद्घाटनही मोदींनी केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून मेट्रोने पुण्यात जाता येणार आहे. चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार आणि पक्षाचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे शहरात मेट्रो सुरु व्हावी, नागरिक सार्वजनिक वाहतुकीकडे वळावेत, सुलभ आणि सार्वजनिक जलद वाहतुकीतून शहराचा विकास व्हावा हे स्वप्न होते. ते साकार झाल्याचा आनंद आहे, अशी भावना त्यांचे बंधू आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केली.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT