Pune News : पुणे शहरातील हडपसरमधील कामधेनु इस्टेट परिसरात असलेल्या एका नामांकित सुपर स्पेशालिस्ट खासगी रुग्णालयात बुधवारी (ता.13) दुपारी जिवंत बॉम्ब आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली. या घटनेमुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तब्बल सात तास या वस्तूची तपासणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर येथील रुग्णालयातील एका टॉयलेटमध्ये ही संशयास्पद वस्तू आढळून आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. बीडीएस पथकाने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयातील हालचालींवर मर्यादा आणण्यात आल्या होत्या. पथकाने अत्यंत सावधगिरीने या वस्तूची सात तास तपासणी केली आणि त्यानंतर ती सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली.
इतक्या मोठ्या आणि गजबजलेल्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये ही वस्तू आलीच कशी? रुग्णालयाची सुरक्षा यंत्रणा नक्की काय करत होती? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दररोज हजारो लोकांची ये-जा असणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची वस्तू आढळणे, हे मोठ्या सुरक्षा त्रुटीकडे बोट दाखवणारे आहे.
ही वस्तू नेमकी कोणी आणि कोणत्या हेतूने ठेवली, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. उपचाराचे अवाढव्य बिल, रुग्णाच्या नातेवाईकाचा असलेला राग किंवा आर्थिक व्यवहारातून कोणाचे तरी हे कृत्य आहे का? अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तांत्रिक तपास आणि रुग्णालयात येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींच्या नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही वस्तू नेमकी काय होती आणि तो खरोखरच बॉम्ब होता का, याबाबतचा अधिकृत अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. मात्र, या घटनेने पुणे शहरात पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.