Sunetra Pawar  Sarkarnama
पुणे

Sunetra Pawar : दौरे, मेळावे, उद्घाटने, सभा, भेटीगाठी; बारामती लोकसभेसाठी सुनेत्रावहिनींचा मेगाप्लॅन

Chaitanya Machale

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राजकीय जीवनात चांगल्याच अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत बारामतीसह शिरूर लोकसभा मतदारसंघात सुनेत्रावहिनींचे दौरे वाढले असून, अगदी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रमांना सुनेत्रा पवार आवर्जून हजेरी लावत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आठ महिन्यांपूर्वी म्हणजे जुलै 2023 मध्ये फूट पडली. अजितदादा पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना सोबत घेऊन शिंदे-फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागीदेखील झाले. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद व अर्थ खाते तर त्यांच्या इतर सहकाऱ्यांना अनेक महत्त्वाच्या खात्यांची मंत्रिपदे देण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाला प्रगतिपथावर नेत असून, तिसऱ्यांदा आता मोदी यांनाच पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक सभांमध्ये जाहीरपणे सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ज्यांना खासदारकीचे तिकीट दिले, त्यांनी गेल्या पाच वर्षांत काहीच कामे केली नाही, असा आरोप करत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पाडणार असे अजितदादांनी जाहीर केले आहे. तर केवळ संसदरत्न पुरस्कार आणि सेल्फी काढून विकासकामे होत नाहीत, असा अप्रत्यक्ष टोला खासदार सुप्रिया सुळे यांना लगावून येणाऱ्या निवडणुकीत बारामतीमध्ये आपला उमेदवार देणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्यात यावे, अशी आग्रही मागणी काही कार्यकर्त्यांनी जाहीरपणे केली होती. मात्र, बारामतीतून नक्की कोणाला तिकीट दिले जाईल याची स्पष्टता अद्यापही कोणत्याच पक्षांनी दिलेली नाही. सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्याचे संकेत मात्र गेल्या काही दिवसांपासून दिले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून बारामती लोकसभामध्ये सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकासकामांची माहिती सांगणारे टेम्पो फिरत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून हे टेम्पो मतदारसंघातील विविध भागात फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीसह शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच असे जाहीर केल्यानंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावत आता सुनेत्रा वहिनीदेखील चांगल्याच अॅक्टिव्ह झाल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात आयोजित करण्यात येत असेलल्या हळदी कुंकू समारंभ, संक्रांतीचे वाण वाटप, होम मिनिस्टर कार्यक्रम, दुकानांची उद्घाटने तसेच महिलांचे मेळावे, मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत सुनेत्रा पवार नागरिकांशी संवाद साधत आहेत.

बारामती लोकसभेबरोबरच शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या हडपसर, शिरूर, घोडनदी या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना सुनेत्रा पवार हजेरी लावत आहेत. शिरूर तालुक्यातील घोडनदी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटनदेखील त्याच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.

दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या निवासस्थानी जाऊन कुल कुटुंबीयांची सुनेत्रा पवार यांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. आमदार कुल यांच्या पत्नी कांचन कुल आणि सुनेत्रा पवार या एकमेकींच्या नातेवाईक आहेत, त्यामुळे ही भेटदेखील महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

खेळ पैठणीचा आणि उखाणा सुनेत्रा वहिनींचा!

शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिक्रापूर येथील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार या सहभागी झाल्या. त्यांनी 'खेळ पैठणीचा' खेळदेखील खेळला. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी 'महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, अजितरावांचे नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून' हा उखाणादेखील घेतला.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT