Pune Traffic Sarkarnama
पुणे

Pune Traffic : अरे देवा ! विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडी फुटायला अजून 'इतके' महिने लागणार

MLA Siddharth Shirole : आमदार सिद्धार्थ शिरोळे करणार विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाची पाहणी.

Chaitanya Machale

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडीने त्रस्त झालेल्या वाहनचालकांना अजून काही महिने वाहतूककोंडीचा हा त्रास सहन करावा लागणार आहे. विद्यापीठ चौकात दोनमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या चौकात खांब उभारणीचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन आहे.

'पीएमआरडीए'च्या माध्यमातून हा दुमजली उड्डाणपूल बांधला जाणार आहे. या कामाचे नियोजन करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी बुधवारी (ता. 10 जानेवारी) विद्यापीठ चौक आणि लगतच्या रस्त्याची पाहणी करणार आहेत.

पुणे विद्यापीठ चौकात होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी काही वर्षांपूर्वी येथे उड्डाणपूल बांधण्यात आला होता. मात्र हा उड्डाणपूल चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याने सुटण्यास कोणतीही मदत झाली नाही. सध्या या रस्त्यावर हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम चालू आहे.

जुन्या उड्डाणपुलाचा या मेट्रो मार्गाला अडथळा होत असल्याने तो पाडून त्याऐवजी नवीन दुमजली उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या भागातील मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर या नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी या रस्त्यांवर सतत होत असते. त्यावर उपाय म्हणून या भागातील रस्ते व नवेदेखील करण्यात आलेले आहेत. मात्र तरीही या भागातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची संख्या मोठी असल्याने सदासर्वदा येथे वाहतूककोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणारा रस्ता वन-वे करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना पाषाण रस्त्याने पुढे जाऊन ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयाच्या पुढील बाजूने उजवीकडे वळून बाणेरकडे जावे लागते, तर पाषाणवरून येणाऱ्या नागरिकांना सकाळनगर रस्त्याने विद्यापीठ चौकाकडे यावे लागते. याच रस्त्याला त्याचे काम सुरू असल्याने सकाळनगरपासून विद्यापीठ चौकापर्यंत येण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो.

विद्यापीठ चौकामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी या भागात दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आहे. या पुलाचे काम गतीने होण्याबरोबरच येथे वाहतूककोंडी होऊ नये, याचे नियोजन करण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मंगळवारी 'पीएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. मेट्रोचे काम करणारी टाटा कंपनी, महापालिकेचा पथ विभाग, वाहतूक पोलिस यांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

पुलाचे काम गतीने करण्यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात आले. त्यानुसार बुधवारी प्रत्यक्ष जागा पाहणी करण्याचे ठरविण्यात आले. या दुमजली उड्डाणपुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे तोपर्यंत या भागातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Edited By- Ganesh Thombare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT