Tukaram Mundhe FDA action Sarkarnama
पुणे

Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंचा निर्णय पाण्यात! मंत्र्यांच्या एका आदेशाने कंपन्यांवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?

Tukaram Mundhe Action Against Companies : तुकाराम मुंढे यांनी एका कंपनीचा परवाना रद्द केला होता. मात्र मंत्र्यांनी या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली. नेमकं प्रकरण काय?

Rashmi Mane

Tukaram Mundhe Decision : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाईवरून राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात मे महिन्यात झालेल्या विषारी दारू दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील मिथेनॉल उत्पादक कंपन्यांविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलली होती. मात्र, या कारवाईतील एका मोठ्या कंपनीला दिलेल्या स्थगितीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशामुळे रांजणगाव एमआयडीसीतील एका कंपनीवरील कारवाईला स्थगिती मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील मिथेनॉल उत्पादक कंपन्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. जून महिन्यात राज्यातील एकूण 936 कंपन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 309 कंपन्यांमध्ये मिथेनॉलची विक्री आणि साठवणुकीसंदर्भात अनियमितता आढळून आली. त्यानंतर प्रशासनाने 70 कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली होती.

मात्र, या निर्णयाविरोधात 22 कंपन्यांनी विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे अपील दाखल केले. यामध्ये रांजणगाव एमआयडीसीतील एका मोठ्या मिथेनॉल उत्पादक कंपनीचाही समावेश होता. या कंपनीचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेतृत्वाशी जवळचा संबंध असल्याची चर्चा आहे.

संबंधित कंपनीवरील कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी पक्षातील एका विद्यमान आमदार आणि माजी मंत्र्याने शिफारस केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात पक्षांतर्गत दबावामुळे स्थगिती दिल्याची चर्चा असली, तरी मंत्री झिरवाळ यांनी दबावाचे आरोप फेटाळले आहेत.

'माझ्यावर दबाव नाही'

नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "अन्न व औषध प्रशासन आयुक्त कार्यालयाने केलेल्या कारवायांसंदर्भात माझ्याकडे सुनावण्या होतात. मात्र त्या संदर्भात पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर आज पर्यंत कधीही दबाव आलेला नाही. अपिलकर्ते जी वस्तुस्थिती समोर मांडतात, ते पाहून सदसद्विवेकबुद्धिनुसार मी निवाडे देतो."

तसेच, मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा 8,500 अपिले प्रलंबित होती. त्यांची संख्या आता 2,500 पर्यंत कमी केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT