Pimpri-Chinchwad NCP  Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad NCP: एका गव्हाणेंची अजितदादांना साथ; तर दुसरे शरद पवारांबरोबर...

Pune NCP News: ...म्हणून अजितदादांबरोबर न जाता शरद पवार यांच्यासोबत राहिलोत, राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकाऱ्यांनी सांगितलं कारण...

उत्तम कुटे

पिंपरी : मागील रविवारी (ता.२) राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली. अजित पवार हे आपल्या समर्थकांसह राज्यातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले. त्याला पाठिंबा देत पिंपरी-चिंचवडमधील बहूतांश राष्ट्रवादी ही अजितदादांच्या पाठीशी राहिली. त्याला अपवाद पक्षाचे प्रदेशवरील दोन पिंपरी-चिंचवडकर पदाधिकारी ठरले. त्यांनी आपण साहेबांसोबत असल्याचे `सरकारनामा`ला आज सांगितले.

सुनील गव्हाणे आणि रविकांत वर्पे हे ते दोन अपवाद ठरलेले पदाधिकारी आहेत. गव्हाणे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, तर वर्पे हे प्रदेश प्रवक्ते आहेत. वर्पे अगोदर राष्ट्रवादी युवकचे प्रदेश कार्याध्यक्षही होते. पवारसाहेबांबाबत आदर व्यक्त करीत राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष अजित गव्हाणे हे आपल्या संपूर्ण कार्यकारिणीसह अजितदादांसोबत गेले आहेत.

मात्र, त्याला अपवाद प्रदेश पातळीवर काम करणारे सुनील गव्हाणे व वर्पे हे दोन पिंपरी-चिंचवडकर ठरले आहेत. वैचारिक मतभिन्नतेतून आपण ही वाट निवडल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिगामी विचारांच्या भाजपसोबत जाऊ शकत नाही, असे सांगत पुरोगामी विचारांच्या पवारसाहेबांसोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या दोघांनीही पक्ष फुटीनंतरच्या कालच्या येवला (जि.नाशिक) येथील पवारसाहेबांच्या पहिल्या जाहीर सभेला हजेरीही लावली. त्यांच्यासारखीच प्रतिक्रिया राष्ट्रवादीशी संलग्न कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष पिंपरी-चिंचवडकर काशीनाथ नखाते यांनीही दिली.

संभाजी ब्रिगेडमधून अजितदादांनी मला राष्ट्रवादीत म्हणजे राजकारणात आणलं, संधी दिली. पण, आरएसएसच्या ज्या विचारधारेशी आतापर्यंत लढलो, त्यांच्याबरोबर म्हणजे भाजपबरोबर कसा जाणार? अशी नेमकी विचारणा वर्पे यांनी केली. मी सोबत करावी, अशी दादांची इच्छा होती.

पण, भाजप आणि राष्ट्रवादीतील वैचारिक मतभिन्नता आ़ड आल्याने अजितदादांना मेसेज टाकून तसे कळवले, असे ते म्हणाले. वर्पेंसारखे मत सुनील गव्हाणेंचेही पडले. वैचारिक भूमिका वेगवेगळी असल्याने मी दादांसोबत म्हणजे भाजपबरोबर कसं जाणार, असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी व वर्पे यांनीही अजितदादांवर प्रेम असल्याचेही सांगितले. दादा परत येऊ शकतात, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT