Uday Samant Sarkarnama
पुणे

Hijab News : ''... त्यामुळे कर्नाटकमध्ये 'हिजाब'वरील बंदी हटणं अपेक्षितच होतं'' ; उदय सामंताचा टोला!

उत्तम कुटे: सरकारनामा

Chinchwad News : कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसची आली. त्यानंतर त्यांनी भाजप राजवटीत लागू केलेली हिजाब बंदी उठविली. त्यासंदर्भात विचारले असता तेथे सरकार कुणाचं आहे, अशी उलट विचारणा करीत काय अपेक्षा करायची? असा टोलाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी चिंचवड येथे काँग्रेसचा उल्लेख न करता लगावला.

मराठा आरक्षणावरून सध्या मनोज जरांगे आणि छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्य़ातून राज्यातील मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे या दोघांनी अशी वक्तव्ये टाळावीत, अशी हात जोडून विनंती सामंत यांनी यावेळी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इम्पेरिकल डाटा सादर न केल्याने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. त्यामुळे तो गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाला महायुती सरकारने ३६० कोटी रुपये दिले आहेत. हा डाटा सर्वोच्च न्यायालयात दिल्यानंतर टिकणारे आरक्षण मिळेल, असा आशावाद त्यांनी व्य़क्त केला. तसेच हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हेही त्यांनीही पुन्हा स्पष्ट केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने पिंपरी-चिंचवडमध्ये शंभरावे मराठी नाट्यसंमेलन जानेवारी महिन्यात होणार असून त्याचे उद्घाटन शरद पवार करणार आहेत. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सामंत आले होते. त्यानंतर मीडियाशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी त्यांनी जरांगेंशी नुकत्याच झालेल्या भेटीत त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. कुणबी दाखला हा वडिलांच्या रक्तसबंधातील व्यक्तीलाच दिला जातो, असे सांगत आईच्या अशा नात्यातल्यांनाही तो देण्याची जरांगेची मागणी त्यांनी अमान्य केली.

शंभरावे नाट्य संमेलन दिमाखदार करा -

औद्योगिक नगरीतील शंभरावे नाट्य संमेलन 'न भूतो न भविष्यती'असे दिमाखदार करा, त्यासाठी सरकार, नाट्य परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी त्याच्या तयारीच्या बैठकीत दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे या संमेलनाला येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आमदार उमा खापरे, नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी यावेळी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT