Pune Polittics| पुणे : ‘आयटी’ची राजधानी, ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्याची दोन तासांत पडलेल्या 125 मिलीमीटर पावसाने दैना केली. ‘पुण्यात (Pune) राहतोय की पाण्यात’ या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या ‘विनोदा’ने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला टांगली. ‘पुणे तेथे काय उणे’ असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या या ‘स्मार्ट सिटी’चा एवढा ‘पाण’उतारा आधी कधीच झाला नाही. अशा शब्दांत दैनिक सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.
सोमवारी (१७ ऑक्टोबर) पुणे शहरासह जिल्ह्यात 125 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. काही तास पडलेल्या पावसामुळे पुण्यातील रस्त्त्यांना कधी नव्हे ते ओढ्याचे स्वरुप आले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर, घरात पाणी शिरले, पाण्याचा निचरा न झाल्याने संपूर्ण शहर जलमय झाले होते. यावरुन स्थानिक प्रशासनावरही पुणेकरांनी ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
सोमवारी पुण्यात दोन तासांत सुमारे 125 मिलीमीटर पाऊस कोसळला आणि या पावसाने पुणे शहराची अक्षरशः वाताहत झाली. माणसांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच हतबल झाले. सोमवारी रात्री जगाने जे तुंबलेले आणि बुडलेले पुणे पाहिले ते भयंकरच होते. एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेवर आहेत. मात्र नैसर्गिक आपत्ती, निसर्गावर माणसाचे नियंत्रण नाही, ढगफुटीसारखा पाऊस अशा केविलवाण्या पळवाटांवरून ते पळ काढत असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पुणे महापालिकेत सत्ता राबविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न दाखविले. मात्र स्मार्ट सिटी तर दूरच; पण पुण्याचे कसे वाटोळे झाले आहे ते सोमवारच्या पावसाने दाखविले. स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या पुण्यात आधीच वाहतूककोंडीने कहर झाला आहे. साधे पाच-सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड-दोन तास लागावे यासारखा ‘विकास’ कोणत्याही शहराच्या नशिबी येऊ नये. अशी चिंताही व्यक्त केली आहे.
पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी रस्त्यावरील पुराच्या परिस्थितीचे खापर पावसावर फोडले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पाऊस पुणे महानगरपालिकेला विचारून किती पडायचं हे ठरवत नाही’ असे ढगफुटीलाही गुदगुल्या करणारे वक्तव्य केले. पाऊस जरी विचारून पडत नसला तरी नियोजन महानगरपालिका आणि सरकारी यंत्रणाच करते ना? देशात, राज्यात आणि पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपने पुण्याच्या विकासाचे भलेमोठे स्वप्न दाखविले, परंतु भाजपच्या स्थानिक कारभाऱ्यांनी कसा कारभार केला त्याचा पर्दाफाश सोमवारी तेथील रस्त्यारस्त्यांवर झाला. अशा शब्दांत सामनातून पुण्यातील भाजप प्रशासनावर आसुड ओढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.