Pune News: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असीम सरोदे आता पुण्यातील गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून विद्यानंद सुहास बापट यांच्या बाजूने उभे राहिले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात होणारे ध्वनी, वायू आणि कचरा प्रदूषण तसेच गणेश मंडपांमुळे होणारे रस्त्यांवरील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सरोदे यांच्या टीमने प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महापालिका आयुक्त तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे. गणेशोत्सवात उच्च क्षमतेचे अॅम्प्लीफायर, डीजे आणि लेझर शोच्या वापरावर नियंत्रण आणण्याची मागणी या नोटीसमधून करण्यात आली आहे.
न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या ध्वनी प्रदूषणासंदर्भातील आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, रुग्णालये, शाळा आणि न्यायालयांच्या परिसरातील सायलेन्स झोनचे पालन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ढोल-ताशा पथकांच्या सामूहिक आवाजाबाबतही ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे, अशी भूमिका सरोदे यांनी मांडली आहे.
गणेश मंडपांमुळे पादचारी, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना अडथळा निर्माण होत असल्यास अशा मंडपांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही नोटीसमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर कॉन्फेटी कॅनन, फटाके आणि प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण आणण्यासह उत्सवाच्या ठिकाणी रिअल-टाइम डेसिबल डिस्प्ले लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
अॅड. असीम सरोदे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. गणेशोत्सवादरम्यान या नोटीसवर प्रशासनाने कारवाई करावी. नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांत उत्तर न दिल्यास गणेशोत्सवानंतर संबंधित यंत्रणांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सण-उत्सव कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नसतात. त्यामुळे ‘भावना दुखावतील’ या कारणावरून नियमांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका आता थांबली पाहिजे. धर्म आणि उत्सव राहिले पाहिजेत; मात्र त्याच्या नावाखाली ध्वनी प्रदूषणाला प्रोत्साहन देता कामा नये, अशी भूमिका सरोदे यांनी मांडली.
ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर सामाजिक प्रबोधन सर्व मार्गांनी झाले पाहिजे. पोलिसांना परिस्थितीची माहिती असते; मात्र झुंडीसमोर पोलीस यंत्रणा अनेकदा कमी पडते. राजकीय व्यक्तींना अशा गोष्टींमुळे लोकप्रियता मिळते आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे काही प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळते, असा आरोपही सरोदे यांनी केला.
ढोल-ताशा पथकांकडूनही सामूहिक आवाज निर्माण होतो. त्यामुळे डीजे असो किंवा अन्य कोणताही मोठ्या आवाजाचा स्रोत असो, नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. मात्र उत्सवाच्या नावाखाली ध्वनी, वायू आणि कचरा प्रदूषण वाढत असेल, तर त्यावर प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजेच्या मुद्द्यावरून प्रशासन आणि उत्सव आयोजकांमध्ये पुन्हा संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.