Union Minister Renuka Singh Sarkarnama
पुणे

खासदार कोल्हेंना त्यांच्या कार्यालयाकडे जाणारा रस्ताही करता आला नाही : केंद्रीय मंत्र्यांची टीका

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिरूरमधील मतदारांनी निवडणूक दिलेले येथील खासदार जनतेत नाहीत.

रवींद्र पाटे

नारायणगाव (जि. पुणे) : जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिरूरमधील (shirur) मतदारांनी निवडणूक दिलेले येथील खासदार जनतेत नाहीत. त्यांना त्यांच्या कार्यालयाकडे जाणार रस्ता करता येत नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री तथा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या (BJP) प्रभारी रेणुका सिंह (Renuka Singh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे (amol kolhe) यांच्यावर नाव न घेता केली आहे. (Union Minister Renuka Singh criticizes MP Amol Kolhe)

दरम्यान, खासदार कोल्हे यांनी रेणुका सिंह यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री सिंह यांनी टीका करण्यापेक्षा राज्यातील त्यांच्या विचाराच्या सरकारला निधी देण्याची सूचना करावी, असे म्हटले आहे.

भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नारायणगाव (ता. जुन्नर) येथे करण्यात आले होते. त्या मेळाव्या बोलताना केंद्रीय मंत्री सिंह यांनी खासदार कोल्हे यांच्यावर टीका केली. या वेळी आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार योगेश टिळेकर, आशा बुचके, एकनाथ पवार ,जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, विघ्नरचे संचालक संतोष खैरे, सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, वंदना कोंदरे, धर्मेंद्र खांडरे, शरद बुट्टे पाटील, अर्चना माळवदकर आदी उपस्थित होते.

देशातून इंग्रज गेले मात्र बाबूशाही सुरू आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्यांची अडवणूक करत असतील तर लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे. प्रशासन, राज्य व केंद्र सरकार यांचा समनव्यय साधून शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व समस्या सोडविण्यात येईल. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी चर्चा करणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही रेणुका सिंह यांनी केले.

सिंह म्हणाल्या की, शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये समस्यांची माहिती घेण्यासाठी मी आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, सर्वसामान्यांचे प्रश्न , समस्या जाणून त्या सोडवणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा अभ्यास करून या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना कसा देता येईल याची माहिती घ्यावी.

टीका करण्यापेक्षा राज्य सरकारला सूचना द्या : अमोल कोल्हे

दरम्यान, केंद्रीय मंत्री सिंह यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, मी केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांच्या निर्दशनास मी एक बाब आणून देऊ इच्छितो की अष्टविनायक महामार्गापैकी राज्य सरकारच्या अखत्यारित असलेला हा रस्ता आहे. कोल्हे मळ्यातील जो रस्ता आहे, तेथील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यासाठीचा २५ कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे.

केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी केवळ राजकारण कारणापोटी टीका करण्यापेक्षा राज्यात त्यांच्या विचाराचे सरकार आहे, त्यामुळे राज्य सरकारने त्यांना तशा सूचना द्याव्यात. स्थानिक भूमिपुत्रांचा हक्क, त्यांचा निधी आहे, तो त्वरित मिळवून देण्यासाठी त्यांनी सहकार्य केले तर स्थानिक भूमिपुत्रांवरील अन्याय दूर होईल आणि रस्तासुद्धा तातडीने आपल्याला करता येईल, असे उत्तर कोल्हे यांनी सिंह यांना दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT