Pune TDR dispute: ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाकडून मिळालेले पुरस्कार ठाण्यातील आनंद दिघे आश्रमात परत करून जवळपास तीन महिने होत आले आहेत. पुण्यातील टीडीआर प्रकरणात न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी पुरस्कार परत केले होते.
मात्र, पुरस्कार परत करून तीन महिने होत आले तरी अद्याप या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. आता उषा चव्हाण यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा आपल्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
या व्हिडिओमध्ये उषा चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत त्यांना पूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. तसेच, शिंदे यांच्या संबंधित व्यक्तींकडून आपल्याला एक पत्र पाठवण्यात आले असून त्यामध्ये काय लिहिले आहे, हेच समजत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
“आज सात दिवसांनी तीन महिने होतील. मी माझा जीवनगौरव पुरस्कार आनंद दिघे आश्रमामध्ये ठेवून आले आहे. मी एकनाथ शिंदे यांना सर्व कायदेशीर मुद्दे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी मला वचन दिले होते की, कोणत्याही परिस्थितीत तुमचे काम करणार,” असे उषा चव्हाण यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
मात्र, त्यानंतरही आपल्याला संबंधित व्यक्तींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “त्यांना कल्पना आहे की नाही माहिती नाही. पण त्यांची लोकं डोक्याला ताप देत आहेत. त्यांनी मला एक पत्र पाठवलं आहे. त्यामध्ये भंजाळल्यासारखं काहीही लिहिलं आहे,” असे त्या म्हणाल्या.
‘आमच्या हक्काचा टीडीआर दुसऱ्याला देताय’
पुण्यातील टीडीआरच्या मुद्द्यावरून उषा चव्हाण यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या टीडीआरसाठी आपण आझाद मैदानावर उपोषण केले, तोच आपला हिस्सा दुसऱ्या व्यक्तीला दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
“ज्यासाठी मी एवढे कष्ट घेतले, उपोषण केले, तीच गोष्ट तुम्ही कुठल्यातरी परप्रांतीयांना माझा हिस्सा देऊन टाकता. कागदोपत्री आमचा हक्क असतानाही आम्हा माय-लेकरांना त्रास देऊन त्यांना काय मिळतं?” असा सवाल त्यांनी केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, असे निर्देश दिल्याचा दावा करत महापालिकेतील काही अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “कोण आहेत हे लोक? यांच्या पाठीशी कोण आहे? हे लोक आम्हाला वारंवार का त्रास देतात?” असा सवाल करत त्यांनी पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांवर निशाणा साधला.
‘शिंदेंच्या पीएने दहा दिवसांत बैठक घेण्याचे सांगितले होते’
एकनाथ शिंदे यांच्या पीएने दहा दिवसांच्या आत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर कोणतीही बैठक झाली नसल्याचे उषा चव्हाण यांनी सांगितले. “शिंदे साहेबांच्या डोक्याला ताप द्यायचा नाही. पण ही आमच्या हक्काची गोष्ट आहे आणि त्यांच्या कानावर जावी म्हणून मी ऑनलाइन आले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “माझी हाय तुम्ही घेऊ नका. अजून किती वर्षांनी न्याय देणार आहात? राज्यात यांची मोगलाई सुरू आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. “माझा कायदेशीर हक्क मला द्या,” अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.
नेमका वाद काय?
हा वाद पुण्यातील धनकवडी परिसरातील एका खाजगी जमिनीवरून सुरू असून या मालमत्तेचा काही हिस्सा उषा चव्हाण यांचे सुपुत्र हृदयनाथ कडू देशमुख यांच्या मालकीचा आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयानेही निर्णय उषा चव्हाण यांच्या बाजूने दिला आहे.
मात्र, उषा चव्हाण यांचा आरोप आहे की, न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही पुणे महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी एका या खाजगी बिल्डर कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी बेकायदेशीरपणे टीडीआर मंजूर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.