jalindar supekar  Sarkarnama
पुणे

Vaishnavi Hagawane Suicide Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट, महिला अन् बालकल्याणचा अहवालात धक्कादायक खुलासे, जालिंदर सुपेकरांच्या अडचणी वाढल्या!

Vaishnavi Hagawane Women and Child Welfare Report Jalinadar Supekar : आरोपी सुटणार नाहीत याची दक्षता महिलांवरील अत्याचार हा विषय केवळ वैष्णवी हगवणे प्रकरणापुरता मर्यादित नसून राज्यात विविध भागात अशा प्रकारच्या अनेक घटना वारंवार घडत असल्याकडेही या अहवालाने लक्ष वेधले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Vaishnavi Hagawane Suicide : पुण्याजवळील मुळशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवगणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. आता या प्रकरणा वैष्णवीचे मामे सासरे पुण्यातील तत्कालीन पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची अडचण वाढली आहे.

या प्रकरणात पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करावी. ते दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्या पत्नीच्या खात्यात रुखवताच्या निमित्ताने हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे दिसून येत असल्याने त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने राज्यात महिलांवरील अत्याचार तसेच हुंडाबळी प्रकरणाबाबतचा पहिला अहवाल विधानसभेत शुक्रवारी सादर केला.

पुण्यातील वैष्णवी हगवणेची आत्महत्या दिसत असली तरी ही पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार व हुंडाबळीचे प्रकरण असून त्या दिशेनेच या प्रकरणाचा तपास केला जावा, पीडित महिलांना मदत मिळावी यासाठी राज्य महिला आयोगाला न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये १६ सदस्य आमदार आहेत. या अहवालात हगवणे प्रकरणातील तपासाचे निष्कर्ष, यातील आरोपींना शिक्षा व पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासह राज्यातील यंत्रणा व व्यवस्थेच्या अंमलबजावणीतील त्रुटी व त्यावरील उपाययोजना, शिफारशी आहेत.

आरोपी सुटणार नाहीत याची दक्षता महिलांवरील अत्याचार हा विषय केवळ वैष्णवी हगवणे प्रकरणापुरता मर्यादित नसून राज्यात विविध भागात अशा प्रकारच्या अनेक घटना वारंवार घडत असल्याकडेही या अहवालाने लक्ष वेधले आहे. हगवणे कुटुंबाने हुंड्याच्या माध्यमातून ब्रँडेड गाडी, चांदीची भांडी, सोने, रोख रक्कम अशा विविध वस्तू व रकमा घेतल्याचे पुरावेही या समितीकडे मिळाले आहे. या प्रकरणात ११ आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल पुराव्यांसह चार्जशीट दाखल करावी. व कोणत्याही परिस्थितीत यातील आरोपी पुराव्याअभावी सुटणार नाहीत याची दक्षता पोलिसांनी घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

कुटुंबाबाबत निरीक्षण व सूचना

- हगवणे कुटुंबातील दोन्ही सुनांना कौटुंबिक हिंसाचार, हुंड्यासाठी छळाला सामोरे जावे लागत होते

मयूरी हगवणे प्रकरणाची वेळेत गंभीर दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण टाळता आले असते.

- मयूरी हगवणेच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी

- वैष्णवीच्या मुलाचा ताबा तिच्या आईवडिलांकडेच ठेवावा. महिला व बालकल्याण विभागाने यासाठी कायदेशीर कारवाई करावी

सुपेकरांवर कारवाई न करणे गंभीर

हगवणे कुटुंबातील निकटवर्तीय पोलिस विभागात वरिष्ठ पदावर काम करत असल्याने या प्रकरणाच्या तपासावर त्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाच्या तपासातून अशा सर्व व्यक्तींना दूर ठेवण्यात यावे. तसेच त्यांचा प्रत्यक्ष प्रभाव, दबाव व हस्तक्षेप या तपासावर होणार नाही याची शक्यता असल्याने विभागाने त्यांची दक्षता घ्यावी. या प्रकरणात सुपेकर हे पदाचा गैरवापर करण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे. तसेच सुपेकरांवर कारवाई न करणे गंभीर असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

सुपेकरवर कारवाई का नाही?

सुपेकर यांची ध्वनिफीत माध्यमांमध्ये प्रसारित झाली आहे. त्याची न्यायवैद्यक विभागाकडून सत्यता पडताळून घ्यावी. सुपेकर यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग स्पष्ट असतानाही त्यासंदर्भात कोणतीही कारवाई पोलिस विभागाकडून करण्यात आलेली नाही, हे गंभीर व आक्षेपार्ह असल्याचे स्पष्ट मत अहवालात व्यक्त केला आहे. याबाबतचा अहवाल समितीने वरिष्ठ पोलिसांकडे मागूनही त्यांनी तो दिला नसल्याची नोंदही करण्यात आली आहे. Vaishnavi

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT