Vasant More and Sainath Babar
Vasant More and Sainath Babar  Sarkarnama
पुणे

तसे नाही तर असे तरी आलोच...! वसंत मोरे अन् साईनाथ बाबर आले एकत्र

सरकारनामा ब्युरो

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) शहराध्यक्ष नेते वसंत मोरे (Vasant More) यांना शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून डावललं जात असल्याची चर्चा सुरू होती. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे हे पक्ष कार्यालयात येतील त्याचवेळी तिथे पाय ठेवेन, असा जाहीर निर्धारही मोरेंनी केला होता. यामुळे मनसेतील वाद समोर आला होता. आता मोरे आणि मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) एकत्र आले असून, खुद्द मोरेंनीच याची फेसबुकवर माहिती दिली आहे.

वसंत मोरेंनी आज एक फेसबुक पोस्ट केली आहे. तसे नाही तर असे तरी एकत्र आलोच. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात थोड्याच वेळात हजर होतोय, असे मोरेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांचा आणि बाबर यांचं एकत्रित छायाचित्र आहे. या दोघांवरही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेत केलेलं आंदोलन या दोघांना भोवलं आहे. या दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे दोघेही आज पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत. मात्र, या निमित्ताने दोघे एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे मोरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमधील वादावर पडदा पडल्याचं मानलं जात आहे.

मनसेच्या वतीने १७ मार्चला पाण्याच्या प्रश्नावरून पुणे महापालिकेत आंदोलन करण्यात आलं होतं. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे परवानगी नसताना महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर गेले होते. त्यांनी तिथे आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर काही मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा १०० ते १२५ जणांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत सुरक्षारक्षकांना ढकलून दिले. नंतर त्यांना महापालिकेच्या आवारात आत प्रवेश केला होता. त्यामुळे प्रवेशद्वाराची कडीही तुटली होती.

महापालिकेच्या आवारात कोणतंही आंदोलन करण्यास मनाई असताना त्यांनी आंदोलन केलं होतं. या प्रकरणी महापालिकेच्या सुरक्षारक्षकाने लेखी तक्रार केली होती. त्यानुसार वसंत मोरे, साईनाथ बाबर यांच्यासह १०० ते १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सात कलमाअंतर्गत हे गुन्हे दाखल केले आहेत. मोरे आणि साईनाथ बाबर यांना या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांना हजर राहण्यास सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT