पुणे : माजी नगरसेवक आणि मनसेचे (MSN) शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना कालपासून उधान आलं आहे. राज ठाकरे (Raj Thackray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात घेतलेल्या भूमिकेवरुन नाराज होवून आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात आले. अशातच आज मोरेंनी त्यांच्या घरावरुन 'मनसे'चा बोर्ड हटवला असल्याचे वृत्तही सोशल मिडीयावर फिरु लागले. याशिवाय "राज ठाकरेंपासून अंतर राखून असलेला एक फोटो आणि त्याला "मी आपला इथेच बरा" असे म्हणत त्यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे या चर्चांना अधिक खतपाणी मिळाले.
मात्र या सर्व चर्चा केवळ चर्चा आणि अफवा असल्याचे स्पष्टीकरण देत वसंत मोरे यांनी आपण मनसे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले, मी कुठे ही जाणार नाही. मी पक्ष सोडणार नाही. पार्ट टाइम काम करणाऱ्यांनी मला पक्ष निष्ठा शिकवू नये, असा टोलाही त्यांनी मनसे राज्य सरचिटणीस अजय शिंदे, हेमंत संभूस यांना लगावला. मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले, मात्र माजिद शेख, शहाबाज पंजाबी त्यांची नाराजी दूर केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
वसंत मोरेंनी दिला होता राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करण्यास नकार :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीच्या समोरील भोंगे न उतरवल्यास समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, अशा भूमिकेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होवून या आदेशाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमधील (Mumbai) चांदिवली, कुर्ला आणि अन्य भागात मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यांवर हनुमान चालीसा लावली आहे. तर काही ठिकाणी भोंगे लावण्याचा प्रयत्न करत असलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
मात्र राज ठाकरे यांचा या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.