Vasant More VS MNS Sarkarnama
पुणे

Video Vasant More : 'महिन्याच्या शेवटच्या दिवसांत विकेट पाडणार', ठाकरे गटाच्या वसंत मोरेंना मनसेच्या कोणी दिली धमकी?

सरकारनामा ब्यूरो

Pune News : मनसेमधून वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करून गेल्या आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांना धमकी देण्यात आली आहे. फेसबुकवर पोस्ट करत मोरे यांनी ही माहिती दिली आहे.मनसे कार्यकर्त्याकडून ही धमकी आल्याचा आरोप मोरे यांनी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

नुकत्याच झालेल्या पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव होत त्यांचे डिपॉजिट देखील जप्त झाले होते. त्यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी आपल्याला स्वीकारले नसल्याचे कारण पुढे करत वसंत मोरेंनी वंचित बहुजनला रामराम केला.

गेल्या आठवड्यात त्यांनी शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटात प्रवेश करत शिवबंधन हातात बांधले. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश झाला. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले होते.

तीन ते चार दिवसांपूर्वी मनसेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी मोरे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आरोप केले होते. त्यांचा भाचा प्रतिक कोडितकर याच्यावर देखील हे आरोप करण्यात आले होते. त्यातच आता वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

अज्ञान व्यक्तीने हा फोन केला होता. याची ऑडिओ क्लिप मोरे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.'या महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुझी विकेट पाडणार' अशी धमकी देण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्याकडून ही धमकी आल्याचे मोरे यांनी म्हंटल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

हा धमकी देणारा कॉल आपल्याला नव्हे तर आपला भाचा प्रतिक याला करण्यात आल्याचे वसंत मोरे (Vasant More) म्हणाले. फोन करणारी व्यक्ती भाचा प्रतिकला म्हणाली की, तू माझी तक्रार कर. माझ्यावर आधीच्या 13 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यात अजून एक होईल. मला यामुळे काही फरक पडणार नाही. यातून मी एखादं वर्षे तुरुंगात जाईन. पण वसंत मोरेंची मी विकेट पाडणारच ! मी मनसेचा कार्यकर्ता असून मनसेचे काम करतो,असं धमकी देणाऱ्याने प्रतिकला म्हणाल्याचं मोरे यांनी सांगितले.

यासर्व प्रकारानंतर वसंत मोरे यांनी ही ऑडिओ क्लिप फेसबुकवर शेअर केली आहे. मी जर पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो तर असा काय गुन्हा केला, की अगदी मनसेवाले माझा मर्डर करण्यापर्यंत गेले ? या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे केली आहे. यावर पोलिस काय भुमिका घेतात, ते पाहू असेही मोरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT