Sharad Pawar, Vasant More Sarkarnama
पुणे

Pune Politics : 'या' मनसे नेत्याच्या मदतीने सुप्रिया सुळे यांचा बारामती विजयाचा मार्ग होणार सुकर?

Sudesh Mitkar

Baramati Lok Sabha Constituency Politics Pune News :

मनसे भाजप समवेत महायुतीमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच पुण्यातील मनसेचे प्रमुख नेते वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. ही भेट नेमकी कशासाठी होती? याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू असतानाच वसंत मोरे यांनी या भेटी मागचा उद्देश माध्यमांना सांगितला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे लढवण्यात येणाऱ्या संभाव्य लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमधून आगामी लोकसभा निवडणुकीची मोर्चा बांधणी सुरू आहे. अशातच मनसे नेते वसंत मोरे हे या ठिकाणी पवार यांच्या भेटीला पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

वसंत मोरे हे सलग तीन वेळा खडकवासला मतदारसंघांमधून मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. तसेच मनसेकडून त्यांनी विधानसभा निवडणूक देखील या परिसरातून लढवली आहे. हा परिसर बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी मनसे नेते वसंत मोरे हे मदतीला येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. कारण मागील निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी मोठा विजय संपादित करूनही खडकवासला मतदारसंघात त्या पिछाडीवर होत्या. त्यामुळे या निवडणुकीमध्ये Supriya Sule यांनी खडकवासला मतदारसंघावर आपलं सर्वाधिक लक्ष केंद्रीत केल्याचं चित्र सध्या दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष मानली जात आहे.

या भेटीनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी आलो होतो. माझ्या प्रभागातील मैदानाचा प्रश्न प्रलंबित आहे. या संदर्भात ही भेट होती. या प्रश्नासाठी मी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देखील भेटलो आहे. पण प्रत्येक ठिकाणी भेटल्यानंतर या विषयात काहीतरी गुदमरल्यासारखं वाटत आहे. अधिकाऱ्यांवरती कुणीतरी मैदानाचा आरक्षण उठवण्यासाठी प्रेशर टाकत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी यावेळी केला.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनीही हा विषय टाळला आहे. या विषय संदर्भातील पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी दोन महिन्यांपासून तयार करून ठेवलं होतं. काल सुप्रिया सुळे यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला भेटण्यासाठी बोलावलं. या ठिकाणी शरद पवार साहेबही आहेत. याबाबत मला कल्पना नव्हती. माझ्या प्रभागातील दोन एकरावरील आरक्षणाचा हा प्रश्न आहे. हे प्रकरण मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावरतीही घातलं आहे. मात्र हे मैदान बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये येतात. त्यामुळे मी सुप्रिया सुळे यांना पत्र दिलं आहे, असे स्पष्टीकरण मोरे यांनी दिलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामती मतदारसंघाबाबतही मोरे बोलले. बारामती लोकसभा मतदारसंघात काही वातावरण असलं तरी मी मनसेच्याच बाजूने असणार. राज साहेब जो आदेश देतील तोच मला मान्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले

मी बारामती लोकसभा मतदारसंघात इच्छुक नाही. मी पुण्यामध्येच इच्छुक आहे. अमित साहेब जर पुण्यात इच्छुक असतील तर, मी सरेंडर करायला तयार आहे. राजकारणामध्ये कोणी कोणाचा दुश्मन नसतो. या प्रश्नासाठी मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जायला लागलं तरीही मी जाईल, असे वसंत मोरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT