Vasant More News  Sarkarnama
पुणे

Vasant More News: वसंत तात्यांना आता वंचितची किंचित आशा; उमेदवारी की पाठिंबा...

Sudesh Mitkar

Pune News: सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले फायर ब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या हाती पुन्हा एकदा निराशा आली आहे. मोरे यांचा मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांची भेट घेऊन मराठा समाजाचा उमेदवार म्हणून पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये उभे ठाकण्याचा मनसुबा धुळीस मिळाला आहे. आता महाविकास आघाडीसह सर्व दरवाजे बंद झाल्याने वसंत मोरे यांना फक्त वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारी अथवा पाठिंबा मिळण्याची किंचित अशा बाकी राहिली आहे.

मनसेमधून लोकसभा निवडणूक आपल्याला लढवता येणार नाही, याची कल्पना आल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर वसंत मोरे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीची चाचपणी करण्यात येत आहे. त्यानुसार सुरुवातीच्या काळात त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र वसंत मोरे यांच्या हाती काहीच लागलं नाही. त्यानंतर वसंत मोरे यांनी अजून दुसरा पर्यायांचा विचार करताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मुंबई येथे भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरे जाताना वंचित बहुजन आघाडीने आपल्याला उमेदवारी द्यावी अथवा पाठिंबा द्यावा, अशी मागणी या बैठकीत वसंत मोरे यांनी केल्याचं सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर काल वसंत मोरे थेट अंतरवली सराटी घाटली. अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी मनोज जारंगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पुणे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील मतदान आकडेवारीचा कागद सूपूर्त केला. मनोज जरांगे पाटील हे आपल्या उमेदवारीचा नक्की विचार करतील, असा विश्वास देखील यावेळी वसंत मोरे यांनी व्यक्त केला होता.

मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कुठेही अपक्ष उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. लोकसभेत कुणालाही पाठिबा नाही ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, असं देखील जरांगेंनी स्पष्ट सांगितले आहे. जरांगे यांच्या या भुमिकेमुळे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेले वसंत मोरे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्यासमोर अपक्ष निवडणूक लढवणे अथवा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा अथवा उमेदवारी घेण्याचा पर्याय बाकी राहिल्या असल्याचं बोललं जात आहे.

वसंत मोरे यांच्या आतापर्यंतच्या भेटीगाठी

पक्षांतर्गत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी होत असलेले अडकाठी पाहता वसंत मोरे यांनी मनसे पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर सर्वप्रथम महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. तरी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं आणि सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केल्याचा देखील पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी थेट संजय राऊत यांची मुंबई येथे भेट देऊन देखील पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली.मात्र ही जागा काँग्रेसकडे असल्याने शिवसेना ठाकरे गटांकडून देखील त्यांना निराशाच पदरी पडली.

दरम्यानच्या काळात त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या ही भेटीगाठी घेतल्या. मात्र काँग्रेसकडून थेट रवींद्र धंगेकर यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवण्यात आलं. महायुतीकडून देखील मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यानंतर त्यांनी मराठा मोर्चा आणि वंचितकडेही त्यांनी मोर्चा वळविला. परंतू मनोज जरांगे पाटील यांच्या भुमिकेमुळे येथेही मोरे यांच्या पदरी निराशा पडल्याचे पाहायला मिळत आहे. आता मोरे लोकसभा निवडणूक लढण्याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागला आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT