Pune Assembly Elections Sarkarnama
पुणे

Pune Assembly Elections : 'या' 6 मतदारसंघांनी उमेदवाराला दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी दिली नाही

Pune Assembly Elections 2024 : विधानसभा मतदारसंघांची 2009 साली पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेनंतर पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. या 8 विधानसभा मतदारसंघातील पर्वती आणि खडकवासला मतदारसंघ सोडल्यास मागील 3 निवडणुकांमध्ये इतर मतदारसंघांमध्ये दुसऱ्यांदा तोच उमेदवार आमदार झाला असं घडलं नाही.

Sudesh Mitkar

Pune News, 19 Oct : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबतची प्रतिक्षा इच्छुकांसह मतदारांना प्रतीक्षा लागली आहे. पक्षाकडून जातीय समीकरणे, उमेदवारांची ताकद, निवडून येण्याची क्षमता या सर्व गोष्टींची चाचपणी केल्यानंतर उमेदवारी घोषित करण्यात येणार आहे.

मात्र त्याचबरोबर गेल्या काही निवडणुकांमध्ये त्या त्या मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. तर पुण्यातील शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांमध्ये पुन्हा त्याच आमदाराला उमेदवारीची संधी मिळाली नसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

विधानसभा मतदारसंघांची 2009 साली पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेनंतर पुणे (Pune) शहरात आठ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. या आठ विधानसभा मतदारसंघातील पर्वती आणि खडकवासला मतदारसंघ सोडल्यास मागील तीन निवडणुकांमध्ये इतर कोणत्याही मतदारसंघांमध्ये दुसऱ्यांदा तोच उमेदवार आमदार झाला असं घडलेलं नाही.

मागील तीन निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास कसबा, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, हडपसर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी प्रत्येक वेळी नव्या आणि वेगळ्या उमेदवाराला संधी दिल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. तर पुण्यातील विविध मतदारसंघातील आमदारांच्या उमेदवारीचा आणि विजयाचा इतिहास पाहूया.

कसबा

कसबा (Kasba) विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 1995 पासून 2019 पर्यंत दिवंगत खासदार गिरीश बापट हे कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले होते. बापट खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक या कसब्यातून आमदार झाल्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर सध्याचे रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत. यंदा निवडणुकीत जनता पुन्हा रवींद्र धंगेकरांना निवडून देणार की नव्या कोणाला तरी आमदार बनवणार याची उत्सुकता आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 2009 मध्ये या ठिकाणी माजी मंत्री रमेश बागवे हे निवडणूक जिंकून आमदार झाले होते. मात्र 2014 ला या ठिकाणी भाजपच्या दिलीप कांबळे यांनी बाजी मारली त्यानंतर भाजपने उमेदवार बदलत त्यांच्याच बंधू असलेल्या सुनील कांबळे यांना 2019 च्या निवडणुकीत उतरवले त्यांनी देखील ही निवडणूक जिंकली. त्यामुळे यंदा भाजप या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार बदलणार की पुन्हा एकदा कांबळे यांना संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे असणारं आहे. मात्र, कांबळेंना संधी दिल्यास इतिहास पाहता पुन्हा तेच आमदार होणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचं आहे.

वडगाव शेरी

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून 2009 साली राष्ट्रवादीचे बापू पठारे हे विजयी झाले होते. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये 2014 मध्ये भाजपाच्या जगदीश मुळीक यांनी त्यांचा पराभव केला. 2019 ला यांचा जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचा पराभव करत सुनील टिंगरे हे त्या ठिकाणी आमदार झाले. सध्या या ठिकाणी उमेदवारीवरून महायुतीमध्ये खल सुरू असून पुन्हा एकदा संधी मिळाली तर सुनील टिंगरेंना वडगाव शेरीमधील मतदार आमदार म्हणून पसंती देतील का? हे निकालादिवशीच स्पष्ट होईल.

कोथरूड

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 2009 मध्ये त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे हे त्या ठिकाणी आमदार होते. 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करत मेधा कुलकर्णी या आमदार झाल्या. मात्र 2019 ला मेधा कुलकर्णींना तिकीट नाकारत चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार बनले आणि त्यांनी निवडणूक जिंकली. पुन्हा चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक रिंगणात उतरतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे इथे त्यांना पुन्हा यश मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

शिवाजीनगरचा विचार केल्यास 2009 मध्ये शिवसेनेचे दिवंगत आमदार विनायक निम्हण विजय झाले. त्यानंतर भाजपचे विजय काळे 2014 मध्ये विजयी झाले. त्यानंतर सिद्धार्थ शिरोळे यांना 2019 ला संधी देण्यात आली ते देखील विजयी झाले. आता पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

हडपसर

हडपसर विधानसभेतून 2009 साली शिवसेनेच्या महादेव बाबर यांचा विजय झाला. 2014 ला त्या ठिकाणी भाजपचे योगेश टिळेकर हे आमदार झाले. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चेतन तुपे यांनी त्यांचा पराभव केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT