Pune News : गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले आहे. टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात बापट यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चव्हाणचा शोध घेतला. दरम्यान, चव्हाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संतोष चव्हाण हा कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असून, तेथील एका गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार पुणे शहरात त्याच्याविरोधात पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बापट यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चव्हाणच्या पूर्वीच्या गुन्हेगारी रेकॉर्डचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.
विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण हा हनुमाननगर परिसरात काही मित्रांना भेटून गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानंतर त्याने आपला मोबाईल फोन बंद केला आणि पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी तो संपर्काबाहेर राहिला. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, बापट यांच्यावर हल्ला करण्यामागे नेमका काय हेतू होता, हल्ल्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, तसेच या हल्ल्यामागे डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्याशिवाय अन्य काही कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना संबंधित हल्लेखोर तरुण पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय विद्यानंद बापट यांना पोलिस सुरक्षा देण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, बापट यांच्याविरोधातही पोलिसांना एक अर्ज प्राप्त झाला असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा नेमका घटनाक्रम, हल्ल्यामागील कारण आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संतोष चव्हाण विरोधात मारामारी करणे, कट रचने यासारख्या गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तीन वर्षांपूर्वी संतोषने स्वतःच्या वडिलांनाही मारहाण केली होती. तेव्हापासून वडिलांनी त्याच्यासोबतचा संपर्कही तोडला होता. दरम्यान, आज सकाळी विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण हनुमान नगर परिसरात येऊन काही मित्रांना भेटून देखील गेला होता. मात्र, अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.