Bishnoi Gang In Kolhapur : कोल्हापूर कोर्टात ‘007 बिष्णोई टोळी’चा थरार; पळण्याचा प्रयत्न फसला, दोघे अटकेत

007 Bishnoi gang leader Shyamlal Punia and aide Shriram Manju arrested from Kolhapur court premises after a police trap : वकील-पक्षकारांच्या वेषात पोलिसांचा सापळा; दोन्ही गेट बंद करून पाठलाग, पुणे गोळीबारातील संशयितासह साथीदाराला अटक
007 Bishnoi gang
007 Bishnoi gangSarkarnama
Published on
Updated on

Bishnoi gang leader escape attempt at Kolhapur court : राजस्थानातील कुख्यात ‘007 बिष्णोई टोळी’चा प्रमुख श्यामलाल गोवर्धनराम पुनिया (29) आणि त्याचा साथीदार श्रीराम मांजू उर्फ पाचाराम बिष्णोई (29) यांना कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यात आली.

पोलिसांनी वकील आणि पक्षकारांचे वेष धारण करून न्यायालय परिसरात सापळा रचला होता. पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी मोटारीतून पसार होण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी दोन्ही गेट बंद करून त्यांचा पाठलाग करत त्यांना पकडले.

ही कारवाई शनिवारी दुपारी सुमारास कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात करण्यात आली. पुण्यातील एका स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार केल्यानंतर पसार झालेला श्रीराम मांजू आणि राजस्थानातील विविध गुन्ह्यांमध्ये संशयित असलेला श्यामलाल पुनिया न्यायालयीन कामकाजासाठी कोल्हापुरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.

दोन्ही संशयितांकडे शस्त्रे असण्याची शक्यता आणि श्यामलाल पुनियाने यापूर्वी पोलिसांवर (Police) गोळीबार केल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी न्यायालय परिसरात सापळा रचला. काही पोलिस कर्मचारी वकील, तर काही पक्षकारांच्या वेषात तैनात करण्यात आले.

007 Bishnoi gang
BJP Dharmendra Pradhan : NEET-UG पेपरफुटी प्रकरण वाद पुन्हा तापला; धर्मेंद्र प्रधानांविरोधात तक्रार, 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दावा

मांजू आणि पुनिया पार्किंगमधून बाहेर पडत असताना त्यांची नजर पोलिसांवर पडली. पोलिस आल्याचे लक्षात येताच दोघांनी पांढऱ्या मोटारीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गेटवरील कर्मचाऱ्यांना इशारा देऊन दोन्ही गेट बंद केले. त्यामुळे मोटार पुन्हा पार्किंगच्या दिशेने वळवावी लागली. याच वेळी पोलिसांनी झडप घालत दोघांना ताब्यात घेतले.

007 Bishnoi gang
BJP Rishikesh Shete Attack : नेवाशात भाजप जिल्हा उपाध्यक्षाला घेरलं; वाहनाची तोडफोड, 90 जणांवर गुन्हा

पुण्यातील गोळीबारानंतर मांजू पसार

18 जून 2026 रोजी रात्री पुण्यातील मंतरवाडी, फुरसुंगी परिसरातील स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित श्रीराम मांजू उर्फ पाचाराम बिष्णोई तेव्हापासून पसार होता. दरम्यान, राजस्थानातील विविध गुन्ह्यांमध्ये संशयित असलेला श्यामलाल पुनिया याचाही पोलिसांकडून शोध सुरू होता. दोघे कोल्हापुरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील खंडणीविरोधी पथकाला माहिती दिली. यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि श्रीनिवास कामुनी यांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले.

2020 मध्ये कोल्हापूर पोलिसांवर गोळीबार

‘007 बिष्णोई टोळी’चा कोल्हापूर पोलिसांशी यापूर्वीही थेट सामना झाला आहे. 2020 मध्ये टोळीतील सदस्यांनी कर्नाटकात गुन्हा केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या पथकाने किणी टोलनाका येथे त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी टोळीतील सदस्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणाचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. न्यायालयीन कामकाजासाठी कोल्हापुरात आलेल्या दोघांवर पोलिसांनी लक्ष ठेवले होते.

पुनियावर 17, मांजूवर 26 हून अधिक गंभीर गुन्हे

पोलिसांच्या माहितीनुसार, श्यामलाल पुनिया याच्याविरोधात खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र बाळगल्यासह 17 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तर श्रीराम मांजू याच्याविरोधात खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी, घरफोडी आणि मारामारी यांसारखे 26 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मांजूविरोधात रावेत पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल असल्याने त्याचा ताबा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पथकाकडे देण्यात येणार आहे. तर श्यामलाल पुनिया याचा ताबा राजस्थान पोलिस घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com