Vidyanand Bapat 
पुणे

Vidyanand Bapat: विद्यानंद बापटांना आधी मारहाण अन् आता गुन्हा दाखल होणार? कोथरुड पोलिसांकडं आली तक्रार

Vidyanand Bapat: पुण्यात गणेशोत्सवानिमित्त विविध उत्सवांमध्ये लावल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरविरोधात बापट सातत्यानं आवाज उठवत आहेत.

Amit Ujagare

Vidyanand Bapat: पुण्यात गणेशोत्सवानिमित्त विविध उत्सवांमध्ये लावल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरविरोधात सातत्यानं आवाज उठवणारे तसंच सर्वसामान्य जागरुक नागरिक अशी ओळख सांगणाऱ्या विद्यानंद बापट यांना गुरुवारी सकाळी मारहाण झाली. त्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

हिंदू सेवा संघ नावाच्या एका संघटनेकडून विद्यानंद बापट यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्ये करून हिंदूंच्या.धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि भारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आवा, अशी मागणी करणारी तक्रार पुण्याच्या कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. कोथरुडमधील रहिवासी रोहित रमेश मारणे यांनी ही तक्रार दिली आहे.

तक्रारदारानं आपल्या तक्रारीत म्हटलं की, पुण्यातील रहिवासी विद्यानंद बापट यांनी नुकतीच काही सार्वजनिक वक्तव्ये केली आहेत, जी अत्यंत बेजबाबदार, चिथावणीखोर आणि जाणीवपूर्वक हिंदू सम्जाच्या धार्मिक भावना दुखावणारी आहेत. त्यांच्या या कृत्यामुळं समाजातील शांतता भंग पावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

त्यांच्यावर पुढील मुद्द्यांच्या आधारे कायदेशीर कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदारानं केली आहे. त्यानुसार,

हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणे, अस्वस्थता निर्माण करणे:

ऐन गणेशोत्सवाच्या काळात, जेव्हा संपूर्ण हिंदू समाज अत्यंत भक्तिभावाने सणाची तयारी करत आहे, तेव्हा बापट यांनी जाणीवपूर्वक सार्वजनिक मंचांवरून आणि माध्यमांमधून अशी वक्तव्ये केली आहेत ज्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक हिंदू धर्मातील उत्सव आणि श्रद्धांना लक्ष्य करत समाजात अस्वस्थता आणि तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हिंदू समाजात तीव्र संताप असून, यातून भविष्यात कोणतीही आणीबाणीची किंवा कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास, त्यास सर्वस्वी विद्यानंद बापट यांनाच जबाबदार धरण्यात यावे.

संविधानाचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अवमान :

एका मुलाखतीमध्ये त्यांनी 'मी बहुमत मानत नाही' असे अत्यंत गंभीर वक्तव्य केले आहे. वरवर पाहता त्यांनी हे वक्तव्य गणेशोत्सवाच्या संदर्भात दिले असल्याचे भासवत असले, तरी त्यांचा मूळ हेतू अत्यंत घातक असू शकतो. 'बहुमत न मानणे' हे थेट भारतीय लोकशाहीला, भारतीय संविधानाला आणि पर्यायाने संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या लोकशाही व्यवस्थेला दिलेले खुले आव्हान आहे. यातून भारतीय राज्यघटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अराजकता माजवण्याचा त्यांचा छुपा हेतू आहे का? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

बापट यांना पुणेकरांचा वाढता पाठिंबा

बापट यांनी वर्षानुवर्षे गणेशोत्सवासह विविध महापुरुषांच्या जयंत्यांमध्ये वाजवण्यात येणाऱ्या जीवघेण्या लाऊडस्पीकरला कंटाळलेल्या नागरिकांची एकजूट घडवून आणली आहे. त्यामुळं विद्यानंद बापट यांनी सातत्यानं माध्यमांमध्ये या डीजे आणि लाऊडस्पीकरविरोधात भूमिका मांडत असताना त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुणेकर ज्येष्ठ नागरिकही रस्त्यावर उतरले होते. हातात फलक घेऊन त्यांनी फर्ग्युसन रोडवरील गुडलक चौकात गेल्या आठवड्यात आंदोलन केलं. त्यामुळं शांततेत जगण्याचं स्वातंत्र बहाल केलेल्या संविधानातील तरतुदीचा दाखला देताना याला आता जनचळवळीचं स्वरुप प्राप्त होऊ लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT