Vijay Shivtare announces unconditional support to NCP, reshaping Purandar Panchayat Samiti power dynamics amid BJP alliance discussions. Sarkarnama
पुणे

Purandar Panchayat Samiti : विजयबापू शिवतारेंचा संजय जगतापांना धोबीपछाड : राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला शिवसेनेचा धक्का

Purandar Panchayat Samiti News : पुरंदर पंचायत समितीत विजय शिवतारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत भाजप-राष्ट्रवादी संभाव्य युतीला धक्का दिला. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील सत्तासमीकरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता.

Sudesh Mitkar

Pune News : सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. बहुमताची समीकरणे जुळवण्यासाठी विविध युती-आघाड्या अस्तित्वात येताना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष वेगवेगळे लढले असले, तरी आता सत्तास्थापन करण्यासाठी ते एकत्र येताना दिसत आहेत.

पुणे जिल्हा परिषदेची स्थिती पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्याचे दिसते. परंतु पुणे जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्यांमध्ये राजकीय पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असून त्यांच्या 4 सदस्यांची निवड झाली आहे.

तर भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रत्येकी 2 सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमतासाठी एका सदस्याच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतील नेमक्या कोणत्या पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून खलबते सुरू आहेत.

त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वातील भाजपमध्ये सत्तेसाठी वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे आमदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वातील शिवसेना राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीसोबत भाजप युतीच्या चर्चा करून उपसभापतीपद आपल्या पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहे.

त्याचवेळी विजय शिवतारे यांनी राजकीय खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दर्शवला असल्याचे समोर आले आहे. जगताप यांना शह देण्यासाठी शिवतारेंनी ही खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजप-राष्ट्रवादी संभाव्य युतीच्या चर्चांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. आता शिवसेनेच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समितीत सभापतीपदासाठी बहुमत सिद्ध करणार असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT