Scam of seven Hundred crores : महिन्याला पाच टक्के मूळ रक्कम व पाच टक्के व्याज असा मिळून दरमहा दहा टक्के परतावा, तसेच २० महिन्यात दामदुप्पट देण्याचे आमिष एपीएस वेल्थ व्हेंन्चर्सचे संचालकाने दाखविले. त्यानुसार गेल्या ११ महिन्यात या कंपनीच्या माध्यमातून पुण्यासह राज्यातील अनेकांनी गुंतवणूक केल्याची माहिती आहे.
दरम्यान, कंपनीचे संचालक राठोड फरार झाला आहे. त्याच्याविरोधात मंगळवारी (ता. १८) चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे ७०० कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, १६ कोटींची गुंतवणूक करणाऱ्यांनी दुसरी तक्रार दिली आहे.
Pune Fraud News बाणेर रस्त्यावरील एपीएस वेल्थ व्हेंन्चर्स या खासगी शेअर मार्केट कंपनीत २०११ पासून लोक गुंतवणूक करीत होते. गेल्या काही महिन्यात या कंपनीत मोठी गुंतवणूक झाल्याची माहिती आहे. ती रक्कम घेऊन कंपनीचा संचालक फरार झाला आहे. दरम्यान, एपीएस वेल्थ व्हेंन्चर्सच्या माध्यमातून १६ कोटींची गुंतवणूक करणारे वाकड येथील डॉ. जयदीप शंकरराव जाधव यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दिली आहे. त्यानुसार एपीएस कंपनीचे संचालक अविनाश अर्जुन राठोड व त्यांच्या पत्नी विशाखा अविनाश राठोड (रा. आनंदबन सोसायटी, रावेत) यांच्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Pune Police आरोपींनी फिर्यादी जाधव यांना जादा परताव्याचे आमिष दाखवून एपीएस वेल्थ व्हेंन्चर्स एलएलपी या कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पडाले. त्यानुसार फिर्यादी जाधव यांनी ८६ लाख रुपये आणि त्यांच्या नातेवाईकांनी १५ कोटी ४५ लाख आरोपींनी सांगितलेल्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक केली. त्यासाठी आरोपींनी जादा परताव्याचे आमिष दाखवून करार करुन घेतला होता. परंतु आरोपींनी परतावा दिला नाही. यातून फिर्यादीसह इतर गुंतवणुकदारांची सुमारे १६ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी राठोड दाम्पत्याने अशाच प्रकारे शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या कंपनीत पुण्यासह राज्यातील अनेक लोकांनी पैसे गुंतविले आहेत. हा आकडा सुमारे ७०० कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र राठोडने केलेल्या फसवणुकीची रक्कम अद्याप समोर आली नाही. दरम्यान, या प्रकरणाला 'सरकारनामा'ने प्रथम वाचा फोडली होती.
जीवनाची पुंजी लुटली
सुरुवातीला दिलेल्या परताव्यामुळे नागरिकांचा आरोपीवर विश्वास बसला होता. त्यातून मिळालेल्या तोंडी प्रसिद्धीमुळे कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली होती. या वर्षभरात कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. दामदुप्पट मिळत असल्याने काही नागरिकांनी कोटीमध्ये रक्कम गुंतविली आहे. हा आकडा सुमारे ७०० कोटींचा असल्याची माहिती आहे. आता कंपनीचे कार्यालय बंद असल्याने अनेकांची जीवनभराची पुंजी लुटली गेल्याचे समोर आले आहे.
'बार्शी'ची पुण्यात पुनरावृत्ती
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी शहरात सुमारे दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. शेअर बाजारात गुंतवणूक करून दामदुप्पट रक्कम परत देण्याचे आमिष दाखवून सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणात विशाल फटे या कंपनी चालवणाऱ्या तरुणाला अटक झाली होती. त्या प्रकरणात फटे अद्यापही जेलमध्येच आहे. पुण्यात झालेल्या या नव्या घोटाळ्यातदेखील दरमहा १० टक्के रकमेच्या परताव्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांची कोट्यवधीची फसवणूक झाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.