Vishnu Hinge, Dilip Mohite sarkarnama
पुणे

42 लाख रुपयांची वसुली सुरू केलीय म्हणून आमदार मोहिते भडकलेत!

पक्ष निष्ठेबाबत दिलीप मोहिते यांनी मला शिकवू नये.

डी. के वळसे पाटील

मंचर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (कात्रज डेअरी) केलेले आरोप बिनबुडाचे, चुकीचे आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यांनी राजकीय जीवनात शिवराळ भाषेत दुसऱ्याला नावे ठेवणे. वाद घालणे, खोटे आरोप करणे या पलिकडे दुसरे कोणतेही काम केल्याचे दिसत नाही. अशी जोरदार टीका पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे (Vishnu Hinge) यांनी केला.

मंचर (ता.आंबेगाव) मोहिते यांनी दुध संघावर व संचालक मंडळावर केलेल्या आरोपांचे खंडन हिंगे यांनी केले. या वेळी हिंगे म्हणाले, दीलीप मोहिते हे आमचे नेते आहेत. मात्र, सभासदांचा आणि जनतेचा गैरसमज होऊ नये. या उद्देशाने आपण दुध संघाची बाजू मांडत आहे. संघाचे कामकाज पारदर्शक असल्यामुळेच पाच वर्षाच्या कालावधीत दुध संघाला १४ कोटी ८९ लाख रुपये नफा झाला. भागधारकांना १५ टक्के लाभांश दिला. मोहिते समर्थक अरुण चांभारे संघाचे संचालक असताना त्यांच्या शिफारशीवरुन त्यांच्या कुटुंबातील सदस्याला कात्रजची वितरण एजन्सी दिली गेली होती. त्यांच्याकडेचे ४२ लाख रुपये येणे बाकी आहे. त्या रक्कम वसुली प्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे. त्याचा राग मोहिते यांच्या मनात आहे. चांभारे यांना सहकार्य करावे, म्हणून त्यांनी मला अनेकवेळा फोन केलेला असल्याच गंभीर आरोप हिंगे यांनी केला.

पक्ष निष्ठेबाबत दिलीप मोहिते यांनी मला शिकवू नये. युवकचा अध्यक्ष म्हणून ११ वर्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आंबेगाव तालुका अध्यक्ष म्हणून गेल्या १५ वर्षापासून काम करत आहे. दुसऱ्या पक्षातून येवून मी पद मिळविले नाही. दुध उत्पादकांनी पाच वेळा मला संचालक म्हणून बिनविरोध संघावर निवडून दिले आहे. गेली सहा वर्ष चेअरमन म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाचे सहकार्याने काम करत असल्याचे हिंगे म्हणाले.

दुध संघाला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने क्वॉलिटी मार्क, इनोव्हेटिव्ह, ऊर्जा बचत, सहकार निष्ठ पुरस्कार मिळालेले आहेत. दुध व्यवसायात मोठी स्पर्धा असतानाही संघाने दूध संकलन, दूध व दुग्धजन्य पदार्थाची विक्रीमध्ये वाढ करुन, कात्रज ब्रॅण्ड महाराष्ट्रात लोकप्रिय केलेला आहे. कामगारांचे पगारात प्रतिमाह सुमारे आठ ते दहा हजार रुपये वाढ केलेली, असे हिंगे म्हणाले. मोहिते सोडून दुध उत्पादक शेतकरी व कर्मचारी संघाच्या कामकाजावर समाधानी आहेत. शेखर शेटे व चांभारे दोघेही खेड तालुक्यातील आहेत. त्यांच्यातील वाद तालुक्यातच मिटवणे गरजेचे आहे. मात्र, नैराश्यापोटी संघाविरुद्ध मोहिते गरळ ओकत आहे. कृपया शेतकऱ्यांच्या मालकीच्या संघाची प्रतिमा त्यांनी मलीन करू नये, असे आव्हानही हिंगे यांनी केले.

दुध संघाचा ऑडिट वर्ग सतत 'अ' आहे. बँकेतील ठेवी ५८ कोटी ३९ लाख रुपये (पाच वर्षातील वाढ ३३ कोटी ८८ लाख रुपये) आहे. गंगाजळीत १०० टक्के गुंतवणूक सात कोटी २९ लाख रुपये. नविन प्रकल्पासाठी केलेली गुंतवणूक २० कोटी २४ लाख रुपये आहे. सहा वर्षात संघाची आर्थिक वाढ ११० कोटी ३३ लाख रुपये, असल्याचे हिंगे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT