Katraj Dairy Election Sarkarnama
पुणे

कात्रजच्या अध्यक्षांना ZPच्या माजी उपाध्यक्षांचे आव्हान; तर मामा-भाच्यांत कोण बाजी मारणार

पुणे जिल्हा सहकारी दूध संघासाठी येत्या रविवारी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत १६ जागांपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत अकरा जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात विद्यमान अध्यक्ष विष्णू हिंगे यांच्यासह पाच संचालक पुन्हा रिंगणात असून एका संचालिकेचे पती, तर दोन माजी संचालक यंदा नशिब आजमावत आहेत. तसेच, झेडपीचे दोन माजी पदाधिकारी व एक सदस्य निवडणूक लढवत आहेत. आंबेगावमध्ये अध्यक्ष हिंगे यांना झेडपीचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरेंनी आव्हान दिले आहे, तर मुळशीत मामा-भाच्यामध्ये सामना रंगणार आहे. (voting for Pune District Milk Team will be held next Sunday)

दरम्यान, पुणे जिल्हा दूध संघासाठी येत्या रविवारी (ता. २० मार्च) मतदान होणार आहे. मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी (ता. २१) मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर केले जाणार आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी आज (ता. १८) स्पष्ट केले.

जिल्ह्यातील बारामती व इंदापूर हे दोन तालुके वगळता उर्वरित अकरा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक तालुकास्तरीय मतदारसंघ आहे. या तालुकास्तरीय मतदारसंघाच्या अकरा, महिलांसाठीच्या दोन आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), भटक्या जाती, विमुक्त जमाती (व्ही. जे. एन. टी.) आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

कात्रज डेअरीच्या निवडणुकीतील उर्वरित ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, मुळशी या पाच तालुकास्तरीय मतदारसंघात दुरंगी, तर भोर आणि मावळ या दोन तालुकास्तरीय मतदारसंघात तिरंगी लढती होत आहेत.

आंबेगावमधून कात्रज डेअरीचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी आव्हान दिले आहे. खेडमधून चंद्रशेखर शेटे विरुद्ध अरुण चांभारे अशी पारंपारिक लढत आहे. जुन्नरमधून बाळासाहेब खिलारी विरुद्ध देवेंद्र खिलारी, तर मुळशीतून रामचंद्र ठोंबरे यांच्या विरोधात त्यांचे सख्ये भाचे कालिदास गोपाळघरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिरूरमधून स्वप्नील ढमढेरे विरुद्ध योगेश देशमुख, तर भोरमधून दिलीप थोपटे, अशोक थोपटे आणि दीपक भेलके आणि मावळ तालुक्यातून बाळासाहेब नेवाळे, लक्ष्मण ठाकर, सुनंदा कचरे हे नशीब आजमावत आहेत.

महिला राखीव गटातून केशरबाई पवार, लता गोपाळे, रोहिणी थोरात आणि संध्या फापाळे, तर ओबीसी मतदारसंघातून अरुण गिरे, भाऊ देवाडे, वरुण भुजबळ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून निखिल तांबे, प्रदीप पिंगट हे निवडणूक लढवत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT