Daund News Sarkarnama
पुणे

Daund Politic's : राहुल कुलांचा थोरातांना निवडणुकीआधीच दे धक्का : थेट सभासदांमधून निवडलेल्या मतदार प्रतिनिधींमध्ये बाजी!

PDCC Bank Election 2026 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी निवड प्रक्रिया सुरू आहे. दौंड तालुक्यातील प्रशासक असलेल्या दोन सोसायट्यांमध्ये थेट सभासदांनी मतदान करून प्रतिनिधी निवडले.

सरकारनामा ब्यूरो

Pune, 21 September (प्रकाश शेलार) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकारी सोसायटी मतदारसंघातून (अ गट) मतदान प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया जिल्हाभर सुरू आहे. मात्र, प्रशासक असल्यामुळे दौंड तालुक्यातील दोन सोसायटींमधून थेट सभासदांनी मतदान करून जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवडण्यात आले आहेत.

दरम्यान, या दोन्ही सोसायट्यांमधून भाजप आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी बाजी मारली असून माजी आमदार रमेश थोरात यांना धोबीपछाड दिली आहे. थेट सभासदांमधून मतदान प्रतिनिधी निवडण्याची जिल्ह्यातील ही कदाचित पहिलीच वेळ असावी.

दौंड तालुक्यातील कडेठाण आणि वडगाव दरेकर या दोन्ही सोसायट्यांवर सध्या प्रशासकाची नियुक्ती आहे, त्यामुळे जिल्हा बॅंकेसाठी मतदान प्रतिनिधी निवडीसाठी थेट सभासदांमधून मतदान घेण्याचा निर्णय झाला. दोन्ही संस्थेच्या कार्यक्षेत्रात विशेष सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी संस्थेच्या सभासदांनी मतपत्रिकेद्वारे इच्छुकांना गुप्त मतदान केले. या मतदानात भाजपचे आमदार राहुल कुल समर्थक वसंत इंगळे कडेठाण सोसायटीमधून, तर मिलिंद नागवे वडगाव दरेकर सोसायटीमधून विजयी झाले आहेत.

कडेठाण सोसायटीमध्ये भाजपचे वसंत इंगळे यांना ३९३, तर पराभूत राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण दिवेकर यांना २७२ मते मिळाली. इंगळे यांनी दिवेकर यांचा तब्बल १२१ मतांनी पराभव केला. वडगाव दरेकर सोसायटीत मतदानप्रतिनिधीच्या निवडणुकीत मिलिंद नागवे हे चुरशीच्या लढतीमध्ये अवघ्या तीन मतांनी विजयी झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष नागवे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. विजयी उमेदवार मिलिंद नागवे यांना २०९ मते पडली, तर पराभूत उमेदवार सुभाष नागवे यांना २०६ मते मिळाली. दोन्ही विजयी उमेदवारांचा दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सत्कार केला.

थोरात-कुल 2007 नंतर प्रथमच एकमेकांसमोर

पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधी निवडण्यासाठी आमदार राहुल कुल आणि जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांनी ताकद लावली होती. सर्वजण मतदारांना आपला प्रतिनिधी निवडीसाठी आवाहन करत आहेत. आमदार राहुल कुल आणि रमेश थोरात हे ठरावासाठी २००७ नंतर प्रथमच एकमेकांसमोर उतरले होते, त्यामुळे प्रतिनिधी निवडणुकीला सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसारखे महत्त्व आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT