PMC  Sarkarnama
पुणे

Pune Public issue: नववर्षात पुणेकरांवर येणार 'हे' संकट

Pune Water Supply News: चार धरणांमध्ये केवळ 10 टक्के पाणीसाठा शिल्लक

Chaitanya Machale

Pune: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठा अवघा दहा टक्के शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी पाणीकपात करण्याची वेळ महापालिकेवर येणार आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता असून त्याची अंमलबजावणी तातडीने होऊ शकते.

पुणे शहराचा विस्तार चारही दिशांना होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. यंदाच्या वर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या चारही धरणातील पाणीसाठा 88.41 टक्के इतका होता. यंदाच्या वर्षी मात्र हा पाणीसाठा केवळ 78.47 इतकाच राहिला आहे.

धरणातील कमी होणारा पाणीसाठा आणि नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून उचलले जाणारे पाणी लक्षात घेत महापालिकेने पाण्याची बचत करावी, अशा सूचना पाटबंधारे विभागाने पालिकेला यापूर्वीच दिल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील महिन्यात धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि पालिकेकडून घेतले जाणारे पाणी याची माहिती देण्यासाठी पाटबंधारे विभागातील अधिकारी, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची बैठक देखील झाली. धरणांमध्ये पाणी कमी असल्याने आवश्यक ती उपाययोजना करावी, याचे पत्र देखील काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या प्रत्येक गुरूवारी शहरात दुरूस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पाणीकपातीचा निर्णय अजितदादाच घेणार

पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाणी बचत करा, अशा सूचना केल्या असल्या तरी पुण्यात नक्की कधीपासून पाणीकपात करायची आणि किती प्रमाणात करायची याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत होत असतो. पालकमंत्री या बैठकीचे अध्यक्ष असतात. त्यामुळे पालकमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या मान्यतेनंतरच अधिकृतपणे पाणीकपात केली जाऊ शकते, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT