Kiran Sali
Kiran Sali Sarkarnama
पुणे

‘ठाकरेंसाठी जिवाचं रान केलं, शिवसेनेवर आईसारखं प्रेम केलं; पण सत्ता आल्यावर आम्हाला काय मिळालं?’

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मागील १६ ते १७ वर्षांपासून प्रामाणिकपणे युवा सेना (yuvasena) आणि शिवसेनेचे (shivsena) काम करत होतो. ठाकरे कुटुंबीयांना बदनाम करणाऱ्यांविरोधात पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. ते आंदोलन देशात गाजले आणि ती सुरुवात होती. ठाकरे कुटुंबासाठी आम्ही जिवाचं रानं केलं. शिवसेना पक्षावर आईसारखं प्रेम केलं. पण, आम्हाला काळ मिळालं.? सत्ता आल्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काय चाललंय असं कधी विचारलंसुद्धा नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले युवा सेनेचे सहसचिव किरण साळी (Kiran Sali) यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. (We loved Shiv Sena like a mother: Kiran Sali)

युवा सेनेचे सहसचिव किरण साळी यांनी शिवसेना सोडून एकनाथ शिंदे गटात समाविष्ठ होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत साळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे गटासोबत जाण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. साळी यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा युवा सेना सहसचिवपदाची धुरा सोपवली आहे.

किरण साळी म्हणाले की, मी गेली १५ वर्षांपासून युवा सेनेचे पुणे शहरात काम करत आहे. या अगोदर भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेनेचा पहिला पुणे शहर अधिकारी, शिवसेनेचा उपशहरप्रमुख आणि त्यानंतर युवा सेनेचा सहसचिव म्हणून काम पाहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच युवा सेनेचे सहसचिव म्हणून माझी पुन्हा नेमणूक केली आहे. मागील १६ ते १७ वर्षांत प्रामाणिकपणे सर्वजण युवा सेना आणि शिवसेनेचे काम करत होतो.

ठाकरे कुटुंबीयांना जी बदनाम करणारी लोकं होती, त्यांच्या विरोधात मी पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. ते आंदोलन देशात गाजले आणि ती सुरुवात होती. ठाकरे कुटुंबासाठी आणि लोकांसाठी आम्ही जिवाचं रानं केलं. शिवसेना पक्षावर आईसारखं प्रेम केले. पण आम्हाला काय मिळालं.? सत्ता आल्यावर उद्धव ठाकरे यांनी कधी विचारलंसुद्धा नाही. तुमचं काय चाललंय, तुमची काय कामं आहेत. पुण्यात रोजगाराचे काय प्रश्न आहेत, असेही कधीही उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी विचारले नाही, असा आरोप साळी यांनी केला.

आमच्या प्रश्नांसंदर्भात आम्ही जेव्हा जेव्हा मुंबईला जायचो, तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे, उदय सामंत हेच आम्हाला भेटायचे. म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मी लहान असल्यापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण मांडवाखाली बसून ऐकत होतो. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापासून प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत आलो होतो. गेल्या अडीच वर्षांत आम्ही त्या विचारांपासून बाजूला गेलो होतो, त्यामुळेच आमचा शिवसेना हा पक्ष एक नंबरवरून चार नंबरवर गेला. आम्ही येथून पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर युवा सेनेची संघटना, जी युवा सेना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या प्रमुख विचारापासून भरटकली होती, त्या मूळ विचारांनुसार राज्यातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी राजकारणाची दिशा किरण साळी यांनी स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT