Jejuri Agitation
Jejuri Agitation Sarkarnama
पुणे

Jejuri Trustee Dispute : ...तर आम्ही ज्ञानेश्वरांच्या पालखीची सेवा करणार नाही; विश्वस्त मंडळावरून जेजुरीकर आक्रमक !

सरकारनामा ब्यूरो

Jejuri and Sant Dnyaneshwar Palkhi Wari : जेजुरी देवसंस्थान विश्वस्त मंडळाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला असल्याचे दिसून येत आहे. सात विश्वस्तांपैकी पाच जण जेजुरीबाहेरील असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आहे. सध्या या विश्वस्त मंडळाविरोधात ग्रामस्थांनी चक्री आंदोलन सुरू केले आहे.

चक्री उपोषणाचा आज बुधवारी (ता. ३१ मे) या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. त्यास वाढता प्रतिसाद पाहता हा विश्वस्त निवडीचा तिढा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी जेजुरीत मुक्कामी असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबाबत प्रशासनास गर्भीत इशारा दिला आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्कामी असते. माऊलींच्या या पालखी सोहळ्यात राज्यभरातूल लाखो भाविक सहभागी असतात. त्या भाविकांची सेवा मुक्कामी असलेल्या संबंधित गाव व परिसरातील नागरिक मोठ्या भक्तीभावाने करतात. गावकऱ्यांच्या या सेवेमुळे पालखी सोहळा पार पडण्यासाठी सरकारला मोठी मदत होते. आता खंडोबा मंदिर विश्वस्तांवरून जेजुरीकरांनी प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले आहे. प्रशासन ग्रामस्थांच्या भावनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागिरकांकडून होत आहे. त्यातून आता जेजुरीकरांनी सरकारला माऊलींच्या पालखी सोहळ्याची सेवा न करण्याचा इशारा दिला आहे. (Jejuri Trustee Dispute)

सहधर्मदाय आयुक्तांनी नेमलेल्या विश्वस्त मंडळास असहकार करण्याचा निर्णय नागिरकांच्या वतीने घेतला आहे. याचा परिणाम भाविकांवर होणार नसल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला आहे. मात्र जेजुरी येथे मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पालखीची व दाखल होणाऱ्या वारकरी भाविकांची सेवा न करण्याचा गर्भीत इशारा ग्रामस्थांनी सरकारला दिलेला आहे. त्याचा परिणाम जेजुरीत मुक्कामी असलेल्या पालखी सोहळ्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा आळंदी येथून ११ जून रोजी माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. हा पालखी सोहळा १६ जून रोजी जेजुरी (Jejuri) येथे मुक्कामी असणार आहे. या दिवशी येथे लाखो भाविक दाखल होणार आहे. दरम्यान, जेजुरी विश्वस्त मंडळाबाबत असलेल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संत ज्ञानेश्वर पालखीची सेवा करणार नाही, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत मंगळवारी (ता. ३०) जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आलेली आहे. येथील वारकऱ्यांची सेवा, सुविधांबाबत सरकारने सोय करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT