Ajit PawarLatest News Sarkarnama
पुणे

अजितदादांच्या मनात चाललंय, तरी काय?

Ajit Pawar : जेथे आपली ताकद आहे, तेथे कामाला लागा, स्वबळावर लढण्याची तयारी सुरु करा

उत्तम कुटे

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह (Pimpri-Chinchwad) राज्यातील इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी करून लढण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आघाडीची सत्ता असेपर्यंत सांगत होते.आता, मात्र ती जाताच त्यांनी ``आघाडीची वाट पाहून नका, स्वतंत्र लढायचे म्हणून तयारी करा``असा आदेश काल सातारा जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांना दिल्याने त्यांच्या मनात नक्की काय चाललंय,अशी चर्चा सुरु झाली आहे. (Ajit PawarLatest News)

पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून पुणे आणि सातारा जिल्ह्यातील निवडणुका स्वतंत्रपणे लढल्याने आघाडीबाबत विचारू नका. तो निर्णय वरिष्ठ घेतील. तोपर्यंत जेथे स्वतंत्र लढलो व जेथे आपली ताकद आहे, तेथे कामाला लागा, स्वबळावर लढण्याची तयारी सुरु करा, असा आदेशच अजितदादांनी पक्ष कार्यकर्त्यांना काल दिला. सत्तापालटानंतर पूलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने आघाडीच्या मानसिकतेतून बाहेर पडत स्वबळाची तयारी अजितदादांनी सुरु केली असावी, असा अंदाज राजकीय जाणकारांनी त्यांच्या बदललेल्या भुमिकेवर व्यक्त केला आहे.

स्बळाची अजितदादांची भाषा किमान पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाच्या पथ्यावर पडणारी आहे. कारण २००२ मध्ये कॉंग्रेसबरोबर केलेल्या आघाडीचा अपवाद वगळता त्यानंतर राष्ट्रवादी पिंपरी महापालिकेत दोनदा स्वबळावर सत्तेत आली होती. त्यामुळे २०१७ ला निसटलेली सत्ता आता २०२२ ला पुन्हा मिळू शकते, असा त्यांच्या स्थानिक नेत्यांचा दावा आहे.

मात्र, आघाडी झाली नाही, तर त्याचा फटका कॉंग्रेस आणि शिवसेनेला बसणार आहे. कारण नुकतीच शिवसेना दुभगंली. त्यात दर निवडणुकीत त्यांची (ठाकरेंची शिवसेना) ताकद म्हणजे नगरसेवकांची संख्याा कमी होत चालली आहे. त्यात त्यांच्या शहरप्रमुखांचा तेवढा करिष्मा नसल्याने आगामी निवडणुकीत आघाडीचे बळ मिळाले नाही, तर हाताच्या बोटावर आलेली त्यांच्या नगरसेवकांची संख्या आणखी कमी होण्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

कॉंग्रेसचीही तशीच अवस्था आघाडीचे बळ मिळाले नाही, तर होणार आहे. त्यांचा, तर एकही नगरसेवक गत सभागृहात नव्हता. त्यात त्यांच्यातही शिवसेनेप्रमाणे गटबाजी आहे. दोन गटात हा पक्ष शहरात विभागला गेलेला आहे. त्यामुळे आघाडीची ताकद नसेल, तर त्यांचे खाते यावेळीउघडेल की नाही, याविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत १५ वर्षे सत्ता भोगलेली राष्ट्रवादी एकला चलो रे च्या तयारीत अगोदरपासूनच आहे. मात्र, बदललेली राजकीय परिस्थिती पाहता आणि भाजपला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आघाडी करण्याच्या मानसिकतेत पक्षाची स्थानिक नेतेमंडळी आहेत.त्याला पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला. शहरात आमची ताकद असल्याने स्वबळाची आमची तयारी आहे. पण, बदललेली राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना व कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याचीही आमची तयारी आहे. एकूणच एकट्याने तसेच आघाडी करूनही आगामी पालिका निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT