माळेगाव (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक नगरपंचायत स्थापन करताना सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप भाजपच्या (BJP) नेतेमंडळींनी विशेषतः रंजन तावरे यांनी केला होता. तसेच, ग्रामपंचायत हवी म्हणून भाजपच्या माजी सरपंचांनी न्यायालयाचे ठोठावलेले दरवाजे, भाजपच्या चिन्हावर नव्हे; तर राष्ट्रवादी विरोधी विकास आघाडी स्थापन करून माळेगाव नगरपंचायतीची आगामी निवडणूक लढवण्याची घोषणा भाजपच्या नेतेमंडळींनी केली आहे. त्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री पवार हे सोमवारी (ता. ६ डिसेंबर) एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माळेगावात येत आहेत. ते विरोधकांच्या आरोपाला काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (What will Ajit Pawar answer to BJP's Ranjan Taware's allegations?)
माळेगाव बुद्रूक येथे प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्या वास्तूचे उद्घाटन सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सभेत पवार येथील नगरपंचायतीच्या राजकारणावर भाष्य करण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. याआगोदर भाजपच्या नेतेमंडळींनी नगरपंचायतीच्या राजकारणावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्तृत्वाविरुद्ध जोरदार टीकेची झोड उठविली आहे. त्यामुळे पवार यांच्या सभेला विशेष महत्व आहे.
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांचे पुतणे आणि माजी सरपंच जयदीप तावरे यांनी आम्हाला माळेगाव ग्रामपंचायतच हवी आहे, नगरपंचायत होताना नियमांचे उल्लंघन झाले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने माळेगाव क वर्ग नगरपरिषद का केली नाही, असे मुद्दे मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित केले आहेत. यामुळे माळेगाव नगरपंचायतीची पंचावर्षिक निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या कचाट्यात अडकली आहे.
एका बाजूला भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीवरून न्यायालयात गेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींनी विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेले मुद्दे जनतेची दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले आहे. माळेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक नाकारण्यासाठी नोव्हेंबर-2020 मध्ये घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीला भाजपचे याचिकाकर्ते उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीतून याचिकाकर्त्यांसह सर्वपक्षीय ७६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची शासकीय पातळीवर नोंद आहे, ग्रामपंचायत निवडणूक नाकारल्यानंतर नगरपंचायतीच्या जयघोष करताना गावकऱ्यांबरोबर याचिकाकर्त्यांचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. कोणत्याही ग्रामपंचायतची लोकसंख्या १५ हजारांपेक्षा अधिकची असेल तर अशा ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा अधिकार सर्वस्वी सरकारचा असतो, या मुद्द्यांकडे राष्ट्रवादीने लक्ष केंद्रीत केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपले पारंपारिक विरोधक रंजन तावरे आणि इतरांच्या आरोपाचा कसा समाचार घेतात, याकडे बारामती तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.