कडेगाव (जि. सांगली) : काँग्रेसचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने सर्व जागा लढविणार आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड यांनी केले. (NCP will contest Kadegaon Nagar Panchayat elections with strength: Sharad Lad)
कडेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत लाड बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी. एस. देशमुख, तालुकाध्यक्ष जयदीप यादव, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते. ते म्हणाले,‘‘राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यात नव्याने पक्षाची बांधणी केली आहे. त्याप्रमाणे कडेगाव शहरातही राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे येथे स्वबळावर नगरपंचायत निवडणूक लढविण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे. तेव्हा राष्ट्रवादी येथे पहिल्यांदाच नगरपंचायत निवडणूक लढविणार आहे. आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’
राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येक प्रभागात इच्छुकांची मोठी संख्या असली तरी सर्वानुमते उमेदवार दिले जातील. तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार यंत्रणा राबवावी. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार घराघरांत पोचवावेत. कडेगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वचनबद्ध आहे. तर अर्थखाते हे राष्ट्रवादीकडे असल्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कुठेही कमतरता भासणार नाही. शहराचा सर्वांगीण व चौफेर विकास साधला जाईल.
या वेळी कडेगाव नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा नीता देसाई, युवक राष्ट्रवादीचे कडेगाव तालुकाध्यक्ष विराज पवार, वैभव देसाई, युवराज देसाई, माऊली देशमुख आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.