Bhor bazar samiti Election
Bhor bazar samiti Election Sarkarnama
पुणे

Bhor Bazar Samiti : भोरमध्ये सर्वपक्षीय एकत्र येतात, तेव्हा काँग्रेसचा पराभव होतो : राष्ट्रवादीच्या नेत्याने डागली तोफ

किरण भदे

नसरापूर (जि. पुणे) : भोर (Bhor) बाजार समितीसाठी (Bazar Samiti) सर्व विरोधक एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र आले आहेत. इतिहास आहे की भोरमध्ये जेव्हा सर्व विरोधक एकत्र येतात, तेव्हा काँग्रेसचा पराभव होतो. आम्ही सर्वजण जिंकण्यासाठीच लढतो आहोत, असे आव्हान राष्ट्रवादीचे (NCP) माजी भोर तालुकाध्यक्ष, पुणे जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांनी आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेसला दिले. (When all parties come together at Bhor, Congress is defeated : Bhalchandra Jagtap)

भोर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या १४ जागांसाठी तालुक्यातील काँग्रेस सोडुन सर्व प्रमुख पक्ष एकत्र येत स्थापन केलेल्या संघर्ष परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ बनेश्वर मंदिरात पूजा करुन करण्यात आला. त्यावेळी भालचंद्र जगताप, कुलदीप कोंडे, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, मानसिंग धुमाळ, जीवन कोंडे, अमोल पांगारे, गणेश निगडे, विश्वास ननावरे, माऊली शिंदे, वंदना धुमाळ, आदित्य बोरगे, प्रकाश तनपुरे आदी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, शिवसेना शिंदे गट या पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते

भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे म्हणाले की, बाजार समितीमध्ये गेली ५० वर्षापासून एकच घर सत्तेवर आहे. सध्याच्या परिस्थितीलाही तेच जबाबदार आहेत. भोर बाजार समिती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाचा अड्डा झालाय.

चंद्रकांत बाठे म्हणाले की, सर्वच उमेदवार हे आपले प्रामाणिक कार्यकर्ते असून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करा नाही तर आपल्याला कोण माफ करणार नाही. विक्रम खुटवड यांनी ही भोर पॅटर्नची नांदी असल्याचे सांगत तालुक्यात सहकारातून शेतकऱ्यांना काय मिळाले, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. सर्वच संस्था स्वतःच्या घरच्या संस्था असल्यासारखा वापर होतोय. सर्व संस्था तोट्यात आहेत, हे बदलण्यासाठी परिवर्तनला साथ देण्याचे अवाहन केले.

कुलदीप कोंडे यांनी यावेळी कोणताही किंतू मनात न बाळगता सर्वांनी एकत्र या. मी स्वतः येथे जाहीर करतो की आपल्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी पुर्णवेळ देत मतदान संपेपर्यंत सर्व 14 उमेदवारांच्या पाठिशी ठाम राहणार आहे. ज्ञानेश्वर शिंदे, मानसिंग धुमाळ यांनीही मनोगत व्यक्त करत बाजार समितीच्या कार्यपद्धतीबाबत आमदार संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली. विरोधकांची एकी कायम राहिली पाहिजे, असे आवाहन केले.

राजगड कारखान्याच्या दुरवस्थेबाबत सर्वच नेत्यांकडून आमदार थोपटे व संचालकांवर टिकेची झोड उठवण्यात आली. कारखान्याच्या या अवस्थेला थोपटेच जबाबदार असल्याचे सांगताना जीवन कोंडे यांनी कारखान्याच्या तोट्याची आकडेवारी जाहीर केली. भालचंद्र जगताप यांनी संचालक असतानाचे थोपटे यांच्या एकाधिकारशाहीच्या कामाचे अनुभव सांगितले. दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपयांचा खर्च दाखवला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

विक्रम खुटवड यांनी प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही म्हणणाऱ्या चेअरमनने कारखाना स्वतःच्या मालकीचा नाही, हे लक्षात ठेवावे, अशी टिका केली, तर कुलदीप कोंडे यांनी शेतकरी व कामगारांची पिळवणूक चालली असून शेतकऱ्यांच्या ऊसाला नाममात्र भाव देऊन तो ऊस चांगल्या भावाने इतर कारखान्यांना विकला जात आहे. कारखान्याचा हिशेब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे, तुम्हाला जमत नसेल तर आमच्याकडे द्या, आम्ही तो सक्षमपणे चालवून दाखवतो असे आव्हान त्यांनी या वेळी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT