Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय डावपेचांनी मी मी म्हणणाऱ्या अनेकांना राजकारणाच्या आखाड्यात धोबीपछाड दिली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे राजकारण संपले, अशी कोल्हेकुई करणाऱ्यांना त्यांनी गुडघे टेकायला भाग पाडले आहे, ते जन्मभर विसरू शकणार नाहीत, असे धडेही शिकवले.
मुत्सद्दी, मातब्बर राजकारणी अशी ओळख असलेल्या शरद पवार यांच्यातील हळवा, कार्यकर्त्यांची काळजी घेणारा माणूसही महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिला आहे. तसाच अनुभव पुण्यात त्यांच्या एकेकाळच्या सहकाऱ्याच्या वाट्याला आला. खुद्द पवारसाहेब रुग्णालयात येऊन आपली विचारपूस करताहेत, हे पाहून त्या आजारी सहकाऱ्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
पुण्याचे (Pune) माजी उपमहापौर अॅड. एन. टी. निकम हे पवारसाहेबांचे एकेकाळचे सहकारी. पवारसाहेब हे मंगळवारी दुपारी कमला नेहरू पार्क परिसरातील एका खासगी रुग्णालयात आले होते. या रुग्णालयात त्यांचे जवळचे नातेवाईक दाखल आहेत. या रुग्णालयात जाऊन त्यांनी आजारी नातेवाईकांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. त्यावेळी तेथे अॅड. निलेश निकम हे पवारसाहेबांना भेटले.
निलेश निकम यांचे वडील एन. टी. निकम यांच्यावर तेथेच उपचार सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर शरद पवार हे थेट निकम यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रूममध्ये पोहोचले. पवारसाहेबांना पाहताच हे ते अवाक् झाले. खुद्द पवारसाहेब आपली विचारपूस करण्यासाठी आल्याचे पाहून निकम यांना अश्रू अनावर झाले. तब्येतीची काळजी घ्या, लवकर बरे व्हा, हे शरद पवार यांचे शब्द निकम यांनी धीर देणारे ठरले.
शरद पवार हे रूममध्ये बेडवर झोपलेल्या निकम यांच्याजवळ गेले. त्यांचा हात हातात घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. काहीवेळ ते निकम यांच्या बेडजवळ उभे राहिले. आजारातून लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. या संवादामुळे अॅड. निकम भारावून गेले. आपल्या संपर्कात आलेल्या गावोगावच्या अनेक कार्यकर्त्यांना शरद पवार हे त्यांच्या नावानिशी ओळखतात. राज्यातील कोणत्याही भागात दौऱ्यावर गेले की ते तेथील आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी आवर्जून भेट देतात. या वयातही तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह त्यांच्यातला आणि अन्य नेत्यांमधील फरक अधोरेखित करणारा असतो.
संकटात असलेल्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना बळ देण्याचे काम त्यांनी नेहमीच केले आहे. कार्यकर्ते, सहकाऱ्यांशी ते कायम ऋणानुबंध जपतात, याची प्रचिती यानिमित्ताने पुन्हा एकदा आली. एन. टी. निकम यांचे 1978 पासून शरद पवार यांच्याशी संबंध आहेत. शरद पवार यांनीच त्यांना 1979 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक लढवण्याची संधी दिली होती. 1987 मध्ये निकम हे पुण्याचे उपमहापौर बनले होते. त्यांना उपमहापौरपदाची संधीही शरद पवार यांनीच दिली होती, असे अॅड. निलेश निकम यांनी सांगितले.
राजकीय डावपेचांनी विरोधकांना नामोहरम करण्याची कला शरद पवार यांना चांगलीच अवगत आहे, हे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रासह देशाने पाहिले आहे. सर्वकाही हातातून निसटते की काय, असे वाटत असताना वयाच्या 84 व्या वर्षात असलेल्या पवारसाहेबांनी नव्याने सुरुवात करून पहिल्याच डावात विरोधकांना आस्मान दाखवले.
विरोधकांना नामोहरम करण्याचे कसब जसे त्यांच्याकडे आहे, तसेच कसब कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचेही आहे. एकदा माणूस भेटला की ते त्याचे नाव, गाव सगळे लक्षात ठेवतात. नावानिशी हाक मारून अनेक जुन्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांनी आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या अॅ़ड. निकम यांनाही पवारसाहेबांच्या मायेच्या ओलाव्याचा अनुभव आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.