Kishor Aware, Satish Shetty, Banty Walunj
Kishor Aware, Satish Shetty, Banty Walunj Sarkarnama
पुणे

Maval News : आवारेंच्या खुनातून अनेक प्रश्न निर्माण झालेत; मावळ तालुक्यातील गुन्हेगारी कोण अन् कशी रोखणार ?

सरकारनामा ब्यूरो

Maval Attack and Killed News : मावळ तालुका दीड महिन्यातच दोन खुनांच्या घटनांनी हादरले आहे. तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषद कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. १२) भरदुपारी जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे (वय ५०) यांची हत्या केली. जमिनीच्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचीही हत्या झाली आहे. त्यामुळे मावळातील रक्तरंजीत इतिहासाची चर्चा सुरू झाली. (Kishor Gangaram Aware Killed)

मावळात (Maval) यापूर्वीही राजकीय वादातून काही खून झाले आहेत. किशोर आवारे यांच्या खूनानंतर मावळत झालेल्या पूर्वीच्या हत्यांच्या घटनांवर चर्चा सुरू झाली आहे. यात सतीश शेट्टी, बंटी वाळुंज, सचिन शेळके, बाळासाहेब केदारी यांच्या खूनांच्या घटनांचा प्रामुख्याने उल्लेख होत आहे. या सर्व घटना राजकीय वाद, जमीनींचे व्यावहारांच्या वादातून झाल्या आहेत. तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेली गुन्हेगारीवर आळा कधी बसणार, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

किशोर आवारे

जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे यांची चार हल्लेखोरांनी शुक्रवारी (ता. १२) निघृण हत्या केली. जमिनीच्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय आहे. आवारे नगपरिषद कार्यालयात ते कामानिमित्त दुपारी आले होते. मुख्याधिकाऱ्यांना भेटून ते बाहेर पडले. त्यावेळी प्रवेशव्दारात दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी आवारेंवर प्रथम त्यांनी गोळ्या झाडल्या. नंतर कोयत्याने वार केले. त्यात आवारे यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रवीण गोपाळे

मावळातील प्रति शिर्डी शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची १ एप्रिल २०२३ रोजी हत्या झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून तीन मारेकऱ्यांनी डोक्यात कोयत्याचे घाव घालून साई मंदिरासमोरच गोपाळेंचा खून केला होता. खून करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी घटनास्थळाची रेकी केली होती. पाळत ठेवून त्यांनी हल्ला केला होता. प्रवीण गोपाळे हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते.

सचिन शेळके

तळेगाव-दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन बाळासाहेब शेळके (३८) यांचा व्यवसायातील वादातून खून झाला आहे. त्यांच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींनी कोयत्याने वार केले. त्यानंतर गोळीबार केला. त्यात शेळके यांचा मृत्यू झाला. ही घटना १६ ऑक्टोबर २०१६ रोजी घडली. तत्पुर्वीही हल्लेखोरांनी शेळके यांच्यावर खुनी हल्ला केला होता. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी असेलेला श्याम दाभाडे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.

बंटी वाळुंज

मावळातील कामशेतमध्ये २०१५ मध्ये मनसे तालुकाध्यक्ष बंटी वाळूंज यांचा खून झाला होता. मनसेचे मावळ तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळूंज (वय ३४) यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. पूर्ववैमनस्य आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून त्यांचा खून झाला होता. वाळुंज यांच्यावर एकूण तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ही घटना ४ ऑगस्ट २०१५ रोजी घडली होती.

बाळासाहेब केदारी

मावळातील आढे गावचे सरपंच बाळासाहेब उर्फ परशुराम नामदेव केदारी (वय ४४) यांचाही २०१५ मध्ये खून झालेला आहे. हा खून राजकीय वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. केदारी तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात गेले होते. तेथून ते दुचाकीवरून परतत होते. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या मानेवर, छातीवर, पोटावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करण्यात आले होते. त्या हल्ल्यात केदारी यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ६ सप्टेंबर २०१५ रोजी घडली होती.

सतीश शेट्टी

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचा २०१० मध्ये खून झाला. मावळा तालुक्यात पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग बनवताना झालेल्या अनेक जमिनींचे कथित गैरव्यवहार सतीश शेट्टी यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून समाजासमोर आणले होते. त्यांनी बाहेर काढलेल्या घोटाळ्यानंतर १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शेट्टी यांना धमक्या देण्यात येत होत्या. त्यामुळे त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. मात्र त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले नाही. त्यानंतर शेट्टी यांच्यावर १३ जानेवारी २०१० रोजी सकाळी दोन हल्लेखोरांनी धारदार हत्यारांनी वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. (Satish Shetty Case)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT